विद्यार्थी, प्रवाशांसाठी कच्छी मेमनच्या वतीने ‘सहरी’; दरराेज ४५० च्या वर मुस्लीम बांधवांना लाभ
By राजेश शेगोकार | Published: March 29, 2023 04:23 PM2023-03-29T16:23:44+5:302023-03-29T16:23:58+5:30
ही गरज ओळखून त्यांना सहेरीची व्यवस्था करण्याची संकल्पना अकोला कच्छी मेमन जमातच्या पदाधिकाऱ्यांना सुचली,व येथील केएमटी हॉल मध्ये सन २००४ पासून सहेरीची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे
अकाेला - मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. या काळात अकाेल्यात राहणारे विद्यार्थी, बाहेरगावावरून नाेकरीनिमित्त एकटे राहणारे तसेच प्रवासानिमित्त अकाेल्यात मुक्कामी आलेल्यांसाठी अकोला कच्छी मेमन जमातच्या वतिने दरराेज ‘सहरी’चे नियाेजन केले
रमजान महिन्यात उपवास (रोजा) ठेवण्यासाठी सकाळी चार वाजेच्या सुमारास अल्पोपाहार (सहेरी) करावी लागते. कामानिमित्त अकाेल्यात स्थायिक झालेल्या अनेक रोजेदारांना, तसेच शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, कामानिमित्त अकाेल्यात प्रवासादरम्यान मुक्काम करावा लागलेल्या प्रवाशांना सहरी साठी सकाळी काेणतीही व्यवस्था हाेत नाही. पहाटे चार वाजता हॉटेल बंद असल्यामुळे तेथेूनही सहेरीची व्यवस्था होत नाही.
ही गरज ओळखून त्यांना सहेरीची व्यवस्था करण्याची संकल्पना अकोला कच्छी मेमन जमातच्या पदाधिकाऱ्यांना सुचली,व येथील केएमटी हॉल मध्ये सन २००४ पासून सहेरीची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. दाेन भाजी, पाेळी, भात , पाणी तसेच चहा अशा स्वरूपात सहरीसाठी पदार्थ पुरविले जातात. यासाठी बिलाल भाई ठेकिया शफी सूर्या यांच्या मार्गदर्शनात वाहिद मुसानी,शाहिद संडा, अशफाक मलक,तौकीर थड़ी, आज़म , बबलू खान,असलम मंडप वाला,साजिद खान,चांद खान,गफ्फार खान,अबरार गाज़ी, हुसैन मुसानी, हनीफ मलक आदी कार्यरत असतात. रमजान महिन्यात रोजेदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी अकोला कच्छी मेमन जमातच्यावतीने त्यांना सहेरी विनामूल्य पुरवले जात आहे त्यासाठी अकोला कच्छी मेमन जमातमधील दानदाते पुढे येतात.
जावेद जकारिया, अध्यक्ष
अकोला कच्छी मेमन जमात