ओबीसी आघाडीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:39+5:302021-03-04T04:33:39+5:30
अकोला : वऱ्हाडात ओबीसी कार्यकर्त्यांची माेठी फळी असून ओबीसींची ताकद वाढविण्यासाठी वऱ्हाडात ओबीसी आघाडी सक्रिय करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पुढाकार ...
अकोला : वऱ्हाडात ओबीसी कार्यकर्त्यांची माेठी फळी असून ओबीसींची ताकद वाढविण्यासाठी वऱ्हाडात ओबीसी आघाडी सक्रिय करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पुढाकार घेऊन बळ द्यावे, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर पवळ यांनी त्यांच्याकडे केला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या थेट संपर्कात असलेल्या पवळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांची भेट घेऊन ओबीसी आघाडीसंदर्भात संवाद साधल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राष्ट्रवादीचे वऱ्हाडातील नेते रामेश्वर पवळ यांनी मुंबईत भेट घेतली. ओबीसी नेत्यांच्या अर्ध्या तासाच्या या भेटीत राजकीय, सामाजिक आणि समाजातील प्रश्नांवर चर्चा झाली. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीने वऱ्हाडात येत्या काळात ओबीसी फॅक्टर अधिक सक्रिय हाेण्याबाबत ही भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तसेच वंजारी समाजाचे नेते असलेले पवळ हे ओबीसी नेते म्हणूनही ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी वंजारी समाजाला विदर्भात अपेक्षित स्थान राजकीय पक्षांकडून मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली होती. यासंदर्भात पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. हे सारे घडत असतानाच ओबीसी नेते म्हणून ओळखले जाणारे नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. हीच संधी साधून समाजाच्या प्रश्नांकडे राष्ट्रवादीसह मित्र पक्षानेही अधिक लक्ष केंद्रित करावे या उद्देशाने त्यांनी पटोले यांची भेट घेतली. या भेटीमुळे ओबीसी आघाडीला बळ मिळाले तर दाेन्ही मित्रपक्षांमध्ये आणखी एक सत्ताकेंद्र तयार हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही केवळ ही सदिच्छा भेट हाेती. मी राष्ट्रवादीतच आहे आणि राहणार, असे पवळ यांनी स्पष्ट केले आहे.