सखी मंचच्या रक्षाबंधनाने पोलीसदादा भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 04:21 PM2019-08-17T16:21:07+5:302019-08-17T16:21:55+5:30
सर्व सखींनी ठाणेदार भानुप्रताप मडावी व उपस्थित सर्व पोलीस दादांना राखी बांधून ओवाळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: लोकमत सखी मंचच्या वतीने पोलीस बंधूंना रक्षाबंधन करण्याचा उपक्रम हा अनुकरणीय असून, ज्या पोलीस बंधूंना रक्षाबंधनासाठी आपल्या बहिणीकडे उपस्थित राहणे शक्य होत नाही त्यांना सखी मंचच्या माध्यमातून अनेक बहिणींची माया मिळते.
लोकमत सखी मंच अकोला च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसद्धा पोलीस बंधूंसमवेत रक्षाबंधनाचा उपक्रम सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन, अकोलामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी लोकमतचे संस्थापक, संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून व दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक अदिती कुळकर्णी यांनी सखी मंचच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन पोलीस बंधूंना राखी बांधण्याचे प्रयोजन विशद केले. यावेळी सर्व सखींनी ठाणेदार भानुप्रताप मडावी व उपस्थित सर्व पोलीस दादांना राखी बांधून ओवाळले. यावेळी पोलीस बंधू भावुक झाले होते.
आपले कर्तव्य पार पाडत असताना अनेक पोलीस बंधूंना आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनासाठी जाणे शक्य होत नाही, त्यामुळे मनात जी रुखरुख राहून जाते. ती सखी मंच सदस्यांनी पूर्ण केल्याने पोलीसदादा भारावले. आम्हाला सखी मंचच्या माध्यमातून एक-दोन नाही तर असंख्य भगिनी मिळाल्या. हा क्षण आमच्या जीवनात ऊर्जा देणारा ठरणार असल्याचा अभिप्राय पोलीस दादांनी दिला.
यावेळी सखी मंच विभाग प्रमुख सोनल ठक्कर, स्वानंदी पांडे, भावना सातारकर, तनुजा ताथोड, विमल डोंगरे, सुवर्णा गडे, संध्या लोहकपुरे, पुष्पा वानखडे, वैशाली निवाणे, रजनी राजगुरू, विभा कोथळकर, मंगला परळीकर, अंजली जोशी, सीमा गिरी या सखींनी पोलीस दादांना राखी बांधून आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे केले.