संस्थाचालक आणि शिक्षकांच्या वादात रखडले वेतन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 12:08 PM2019-10-02T12:08:49+5:302019-10-02T12:09:09+5:30
शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पाच-सहा महिन्यांपासून वेतन रखडले आहे.
अकोला: येथील राष्ट्रीय विद्या निकेतनद्वारा संचालित न.वा.वा. स्वावलंबी विद्यालय व आर.के. शुल्क विद्यालय मुख्याध्यापक पदाला घेऊन आणि संस्थाचालकांच्या जवळचे असणाऱ्या कनिष्ठ शिक्षकांना वाचविण्यासाठी नियम पायदळी तुडवून ज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त ठरविल्याबद्दल वाद सुरू आहेत. या वादात शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पाच-सहा महिन्यांपासून वेतन रखडले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी सोमवारी शिक्षणाधिकाºयांची भेट घेऊन वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.
ज्ञानार्थ प्रवेश...सेवा प्रस्थान अशी शिकवण देणारे स्वावलंबी विद्यालय सध्या वादाचे केंद्र बनले आहे. विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याऐवजी अंतर्गत राजकारण करून शिक्षकांना वेठीस धरण्याचे प्रकार या ठिकाणी सुरू आहेत. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी, शिक्षण संस्थेला अतिरिक्त शिक्षक, रिक्त पदांची माहिती मागविली होती. त्यानुसार शिक्षण संस्थेने सात अतिरिक्त शिक्षकांची नावे पाठवायला हवी होती; परंतु संस्थाचालकांनी जवळच्या कनिष्ठ शिक्षकांना अभय देत, पाच ज्येष्ठ शिक्षकांना अतिरिक्त ठरविले. त्यामुळे या शिक्षकांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. या शिक्षकांनी शिक्षणाधिकाºयांकडे तक्रार केली होती. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांनी शिक्षण संस्थेला नोटीस बजावली होती. शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी शिक्षक अतिरिक्त ठरल्यावर शिक्षक व संस्थाचालकांची सुनावणी घेतली होती. दरम्यान, शिक्षकांनी रोष व्यक्त करून न्याय देण्याची मागणी केली होती. एवढेच नाही तर शिक्षण संस्थेने सुमंगला बुरघाटे यांना मुख्याध्यापक पदावरून बाजूला करून प्रभारी मुख्याध्यापकपदी हरीश शर्मा यांच्याकडे धुरा दिल्यामुळे वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे, या मुख्याध्यापक पदाबाबत संस्थेने शिक्षणाधिकाºयांनासुद्धा सूचना दिली नाही. शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या लेखी बुरघाटेच मुख्याध्यापिका आहेत. याबाबत संस्थेने शिक्षणाधिकाºयांकडे मुख्याध्यापक पदासंदर्भात पत्र दिल्यास, हा वाद मिटू शकतो. या वादामुळे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांचे पाच-सहा महिन्यांपासून वेतन रखडले आहे. संस्थाचालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे शिक्षकांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संस्थेत कोणताही वाद नाही. संस्था अल्पसंख्यक असतानाही सर्वाधिक मराठी शिक्षक आमच्या येथे आहेत. शिक्षण विभागाच्या नियमानुसारच आम्ही शिक्षकांना अतिरिक्त ठरविले. अन्याय केला नाही. मुख्याध्यापक बदलल्यामुळे त्यांचे अॅप्रुअल थांबले आहे. त्यामुळे शिक्षकांचे वेतन रखडले आहे.
- आनंद शुक्ला, सचिव, राष्ट्रीय विद्यानिकेतन
स्वावलंबी विद्यालयात शिक्षक व संस्थेमध्ये अतिरिक्त ठरविल्यावरून व मुख्याध्यापक पदाचा वाद सुरू आहे. सेवाज्येष्ठता डावलून शिक्षकांना अतिरिक्त ठरविल्यामुळे शाळेचे वेतन थांबविले; परंतु शिक्षकांना वेतनाविना ठेवणार नाही. त्यांच्या वेतन फाईलवर स्वाक्षरी केली आहे. तसेच अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर त्यांना मूळ आस्थापनेवर पाठवावे लागेल.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक