रेल्वे स्थानक परिसरात बनावट तिकिटांची विक्री; एकाला अटक
By Admin | Published: June 13, 2016 01:53 AM2016-06-13T01:53:51+5:302016-06-13T01:53:51+5:30
आरपीएफ पोलिसांनी ८ हजार २५ रुपयांची बनावट तिकिटे केली जप्त.
अकोला: रेल्वे स्थानक परिसरातील आरक्षण खिडकीजवळ बनावट रेल्वे तिकिटांची विक्री करणार्या युवकास आरपीएफ पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरपीएफ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश बडे यांना एक युवक बनावट तिकिटांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी रेल्वे स्थानक परिसरातील आरक्षण खिडकीजवळ छापा घातला असता, आकोट येथील दीपक मिनू बिजली (१८) हा बनावट तिकिटांची विक्री करीत असल्याचे दिसून आले. गत काही दिवसांपासून हा युवक रेल्वे स्थानकांवर तिकिटांची दलाली करीत होता. पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले. त्याच्याकडून आरपीएफ पोलिसांनी ८ हजार २५ रुपयांची बनावट तिकिटे जप्त केली. त्याच्याकडे तीन आरक्षणाची तिकिटे मिळून आली. त्यात वातानुकूलित, स्लीपर कोच तिकिटांचा समावेश आहे. दीपकला अटक केल्यामुळे रेल्वे स्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणार्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. आरोपी दीपककडून तिकिटांचा काळाबाजार करणार्या आणखी व्यक्तींची नावे पोलिसांना प्राप्त होऊ शकतात.