नोटरीच्या माध्यमातून चारचाकी वाहनांची विक्री!
By admin | Published: March 24, 2017 02:12 AM2017-03-24T02:12:25+5:302017-03-24T02:12:25+5:30
वाहनांची परस्पर विक्री; बैतुल पोलिसांनी पकडलेल्या टोळीत अकोल्याचा युवक
अकोला, दि. २३- शहरातील खासगी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांची शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर नोटरी करून विक्री केली जात आहे. नोटरी करून चारचाकी वाहनांची विक्री करणार्या एका टोळीला बैतुल (मध्य प्रदेश) पोलिसांनी अटक केली. या टोळीत अकोल्यातील एक युवक आहे. चारचाकी वाहनांची विक्री होत असल्याबाबत रामदासपेठ पोलिसांकडे काही दिवसांपूर्वीच एकाने तक्रार केली होती; परंतु पोलिसांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात जिल्हा याचिका करण्यात आली आहे.
खासगी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून वाहनांची खरेदी करण्यात येते. त्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज मंजूर करण्यात येते. नंतर कर्ज फेडण्यासाठी टप्पे पाडून दिले जातात. शहरात चारचाकी वाहन घेण्यासाठी चोलामंडलम फायनान्स कंपनीकडून अनेकांना कर्ज पुरवठा करण्यात आला. कर्जदारांनी कर्ज न भरताच, त्यांच्याकडील २६ चारचाकी वाहनांची परस्पर विक्री करण्यात आली असून, कर्जाच्या वसुलीसाठी कंपनीने जिल्हा न्यायालयात कलम १३८ नुसार याचिका दाखल केली आहे. चारचाकी वाहन मालकांनी काही अडचणींमुळे नोटरी करून दुसर्यांना वाहनांची विक्री केली. कंपनीला कोणतीही माहिती न देता, त्यांनी परस्पर वाहनांची विक्री केल्याचे कंपनीला कळले. नोटरी केलेल्या प्रतिज्ञापत्रावर कर्जाचा उल्लेख आहे. त्यामध्ये फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणारा व्यक्ती तक्रार केल्यानंतर त्यातून बाहेर पडू शकतो. महागड्या किमतीचे वाहन दोन ते तीन लाख रुपयांमध्ये खरेदी करून ५0 हजार रुपयांमध्ये वाहनाची बनावट कागदपत्रे तयार केली जातात. असेच एक प्रकरण रामदासपेठ पोलीस ठाण्यात मंगेश मोहोड यांनी दाखल केले होते; परंतु पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारीमध्ये अनेक लोकांनी नोटरी करून वाहने विकल्याचे म्हटले आहे. बैतुल पोलिसांनी पकडलेल्या टोळीत अकोल्यातील आरोपीचा समावेश असल्याने, अकोल्यातसुद्धा नोटरी करून चारचाकी वाहन विक्रीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात सुरू असल्याचे सिद्ध होत आहे. अशी माहिती कंपनीचे मोहन कारले आणि अँड. आशिष देशमुख यांनी दिली.