प्लास्टिक पिशव्यांची विक्री; मनपाने पुन्हा केली कारवाई; १० हजार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:48 PM2018-08-29T12:48:33+5:302018-08-29T12:50:09+5:30
मलकापूर रोडवरील गोपाल सुपर बाजारच्या संचालकांना १० हजारांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
अकोला: शासनाने प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिकपासून तयार होणाऱ्या ठरावीक वस्तूंच्या वापरावर बंदी घातल्यानंतरही शहरातील काही व्यावसायिक प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्याची विक्री करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मनपाने कारवाई केल्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर व विक्री करणाºया मलकापूर रोडवरील गोपाल सुपर बाजारच्या संचालकांना १० हजारांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
प्लास्टिक पिशव्या व विघटन न होणाºया इतर वस्तूंमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरणाची हानी थांबवण्यासाठी शासनाने प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलसह इतर वस्तूंवर बंदी घातली. दंडात्मक रकमेचे धोरण स्पष्ट करताच महापालिकेच्या स्तरावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे, त्यांची विक्री करणाºया व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. मंगळवारी दक्षिण झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पूनम कळंबे यांच्या उपस्थितीत आरोग्य निरीक्षकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाºया गोपाल सुपर बाजारची तपासणी केली असता, प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. या प्रकरणी दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला.
प्लास्टिक पिशव्यांचा साठा जमा करा!
शहरातील रेडीमेड कापड व्यावसायिक, विविध वस्तूंची विक्री करणारे व्यावसायिक आजही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. शहरात ‘नॉन वोवन पॉलीप्रापिलीन’ पिशव्या तयार करणारे किरकोळ उत्पादक आहेत. त्यांच्याकडे पिशव्यांचा साठा असेल, तर मनपाच्या खोलेश्वरस्थित मोटर वाहन विभागामध्ये उघडण्यात आलेल्या कक्षात जमा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.