रेशनचे धान्य विक्रीला; १२ रुपये किलोने खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:18+5:302021-09-16T04:24:18+5:30
अकोला : कोरोनामुळे रेशनकार्डधारक पात्र लाभार्थींना केंद्र शासनातर्फे नियमित धान्यासह तेवढेच धान्य मोफत दिले जात आहे. मात्र, अल्पदरात मिळणारे ...
अकोला : कोरोनामुळे रेशनकार्डधारक पात्र लाभार्थींना केंद्र शासनातर्फे नियमित धान्यासह तेवढेच धान्य मोफत दिले जात आहे. मात्र, अल्पदरात मिळणारे धान्य अनेकांकडून ते वाढीव भाव देऊन खरेदी केले जात आहे. यासाठी अनेकजण दर महिन्याला लाभार्थींच्या घरी जाऊन धान्य गोळा करतात व बाहेर आणखी ते जास्त दराने विक्री करत असल्याचे चित्र आहे. हे धान्य १२ ते १३ रुपये किलोने लाभार्थींकडून खरेदी केले जात आहे.
शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांमार्फत मध्यंतरी मोफत; तर आता नाममात्र दराने रेशन कार्डधारकांना धान्य पुरविणे सुरू आहे. त्यातील अनेकांची आर्थिक परिस्थिती मजबूत असून स्वयंपाकात रेशनचा ना गहू वापरला जातो, ना तांदूळ. असे असताना स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन ते बाजारात चक्क विकले जात आहे. गव्हाला साधारणत: १३ रुपये; तर तांदुळाला १२ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याची माहिती प्राप्त झाली.
१२ रुपये किलो तांदूळ
स्वस्त धान्य दुकानातून अत्यल्प दरात मिळणारा तांदूळ लाभार्थींकडून बाजारात १२ रुपये किलो दराने विक्री केला जात आहे. खरेदीदारांची मोठी टोळी प्रत्येक शहरात सक्रिय असल्याने हा प्रकार बळावला आहे.
हे घ्या पुरावे...
डाबकी रोड : शहरातील जुने शहर व डाबकी रोड भागात काही लोक तीन चाकी मालवाहू ऑटो घेऊन फिरतात. यामध्ये तांदूळ १२ रुपये प्रतीकिलो खरेदी केला जात असल्याचे निदर्शनास आले.
मलकापूर : महामार्गालगत असलेल्या मलकापूर या भागात काहीजण महिन्याच्या सुरुवातीला वाहन घेऊन फिरताना आढळून आले. तांदूळ आहे का, तांदूळ अशाप्रकारे ओरडून खरेदी सुरू होती.
मोठी उमरी : रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्यांना या भागातील धान्य विक्री करणाऱ्या नागरिकांची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे खरेदी करणारे बरोबर रेशनचा गहू, तांदूळ विकणाऱ्या व्यक्तीच्या घरी थांबतात.
बिनधास्त फिरतात गाड्या
गरिबांच्या हक्काचे धान्य असे काळ्याबाजारात विकणे हा गुन्हाच आहे. याबाबत पुरवठा विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, कोणतीही भीती न बाळगता ह्या गाड्या रेशनचे धान्य खरेदीसाठी गल्लोगल्ली बिनधास्तपणे फिरताना आढळून येत आहेत.