बनावट दस्तऐवजाद्वारे शेतीची विक्री
By admin | Published: March 15, 2015 01:30 AM2015-03-15T01:30:38+5:302015-03-15T01:30:38+5:30
सुशील खोवाल, जसपालसिंह नागरासह ११ बड्या व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल.
अकोला - बनावट दस्तऐवज आणि खोट्या स्वाक्षरी करून संगनमताने शेतीची खरेदी-विक्री करणार्या शहरातील ११ जणांविरुद्ध शनिवारी रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. जसनागरा हॉटेलचे संचालक जसपालसिंह नागरा, उद्योजक सुशील खोवाल व सुभाष चांडक यांच्यासह ११ जणांविरुद्ध या फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरालगत असलेल्या मलकापूर येथील गजानन वाटिकेमधील रहिवासी सारिका चंद्रशेखर सुंदरबंसी यांच्या आई-वडिलांच्या नावावर असलेली आणि वारसाहक्काने त्यांच्या नावे झालेली अक्कलकोट परिसरातील शेत सर्व्हे क्रमांक ३/९ मधील कोट्यवधी रुपयांची शेती जसपालसिंह नागरा, सुशीलकुमार खोवाल, सुभाष चांडक, सरीता विजय ठाकूर आणि जब्बीर हुसेन सैफ्फुद्दीन तालावाला यांनी बनावट दस्तऐवज व खोट्या स्वाक्षरींच्या आधारे प्रेमाबाई उमाशंकर यादव, राजू उमाशंकर यादव, अमीत उमाशंकर यादव, सपना उमाशंकर यादव, रुपाली उमाशंकर यादव यांच्याकडून खरेदी केली. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये २५ सप्टेंबर २0१२ ते २१ मार्च २0१३ या कालावधीत हा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला असून, यामध्ये सारिका सुंदरबंसी यांची फसवणूक करण्यात आली. त्यांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली, मात्र पोलिसांनी सदर प्रकरण तपासात ठेवले. त्यानंतर सुंदरबंसी यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून सिटी कोतवाली पोलिसांनी जसनागरा हॉटेलचे संचालक जसपालसिंह नागरा, उद्योजक सुशीलकुमार खोवाल, सुभाष चांडक या बड्या हस्तींसह शहरातील ११ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४६८, ४७१, १२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.