खारपाणपट्ट्यातील पिके ‘ऑक्सिजन’वर; शेतकरी चिंतित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:42+5:302021-06-27T04:13:42+5:30

नया अंदुरा : खारपाणपट्ट्यातील पिके पावसाअभावी सद्य:स्थितीत ‘ऑक्सिजन’वर आहेत. मृग नक्षत्रात प्रारंभी पाऊस आल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिके ...

Saline crops on ‘oxygen’; Farmers worried! | खारपाणपट्ट्यातील पिके ‘ऑक्सिजन’वर; शेतकरी चिंतित!

खारपाणपट्ट्यातील पिके ‘ऑक्सिजन’वर; शेतकरी चिंतित!

Next

नया अंदुरा : खारपाणपट्ट्यातील पिके पावसाअभावी सद्य:स्थितीत ‘ऑक्सिजन’वर आहेत. मृग नक्षत्रात प्रारंभी पाऊस आल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली. पिके शेतात बहरलीसुद्धा. मात्र, गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. खारपाणपट्ट्यातील अंदुरा, कारंजा, रमजानपूर, हाता, निंबा फाटा, शिंगोली, निंबा, अंत्री, बहादुरा, सागद, मोखा, जानोरी परिसरात दुपार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.

नया अंदुरा परिसरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने त्यानंतर काही दिवसांत पेरणीच्या कामांनी वेग घेतला होता. सद्य:स्थितीत परिसरातील जवळपास २० टक्के पेरणी आटोपली आहे. आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यातच उन्हाच्या तडाख्याने पिके सुकू लागली असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. हवामान खात्याने मान्सून सक्रिय झाल्याचे सांगताच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी केली. महागडे सोयाबीन बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर मृग नक्षत्रात प्रारंभी पाऊस बरसल्याने शेतकरी सुखावला होता. आता मात्र पावसाने दडी मारल्याने पूर्वीच्या पेरणीत उगवलेली पिके संकटात सापडली आहेत.

-----------------------

दोन एकर कपाशीची परेणी केली असून, पेरणी केल्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली आहेत. येत्या दोन ते चार दिवसांत पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

-संजय अढाऊ, नया अंदुरा, शेतकरी.

------------------------------

वाहाळा परिसरात दुबार पेरणीचे संकट!

वाहाळा बु : पातूर तालुक्यातील वाहाळा परिसरात पावसाअभावी पिके संकटात सापडली आहेत. येथून जवळच असलेल्या पिंपळखुटा येथील शेतकऱ्याने चार एकर शेतामध्ये वखर फिरविल्याचा प्रकार घडला आहे. पाऊस नसल्याने पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. ठिबक सिंचनावरील पिके तग धरून आहेत, तर पावसावर अवलंबून असलेली पिके उन्हामुळे कोमेजत आहेत. कोवळ्या पिकांवर वन्य प्राणी, पक्षी, कीटक ताव मारत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. येत्या आठवडाभर पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

Web Title: Saline crops on ‘oxygen’; Farmers worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.