पाच युवकांनी बनविली खाऱ्या पाण्यावर चालणारी दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:21 AM2021-02-09T04:21:16+5:302021-02-09T04:21:16+5:30
अकाेला : शहरातील काैलखेड चाैकातील रहिवासी तसेच पदवीचे शिक्षण घेत असलेल्या पाच मित्रांनी लाॅकडाऊनच्या काळात एक आगळावेगळा शोध लावला ...
अकाेला : शहरातील काैलखेड चाैकातील रहिवासी तसेच पदवीचे शिक्षण घेत असलेल्या पाच मित्रांनी लाॅकडाऊनच्या काळात एक आगळावेगळा शोध लावला आहे. दुचाकी पेट्राेलवर नव्हे तर चक्क खाऱ्या पाण्यावर चालविण्याचा हा शाेध या पाच मित्रांनी लावला आहे. वडिलांची दुचाकी घेऊन गेल्यानंतर पेट्रोल संपेपर्यंत ते दुचाकी चालवीत असत. त्यामुळे वडील रागावत असल्याने या युवकांनी पेट्राेल न टाकताच दुचाकी चालविण्याचा प्रयाेग गत आठ महिन्यांपूवी सुरू केला. त्यांना आता यामध्ये यश आले असल्याचा दावा या पाच मित्रांनी केला आहे. त्यांना या प्रयोगात आणखी सुधारणा करण्यासाठी सरकार अन् समाजाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
काैलखेड चाैकातील रहिवासी यश जायले, शंतनू झाकर्डे, अभिजीत धर्मे, मंदार कल्ले आणि महेश घाटे हे पदवीच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहेत. हे पाचही जण सध्या एका भन्नाट प्रयाेगात गुंतले असून चक्क खाऱ्या पाण्यावर दुचाकी चालविण्याचा प्रयाेग त्यांनी यशस्वी केला आहे. लॉकडाऊन सुरू असताना आठ महिन्यांपूर्वी त्यांनी बंद पडलेल्या दुचाकीचे विविध सुटे भाग एकत्र करून दुचाकी बनविली. त्यानंतर पेट्राेलवर नव्हे तर ती दुचाकी खाऱ्या पाण्याच्या साहाय्याने चालविण्याचा प्रयत्न सुरू केला. रसायनशास्त्रातील ‘इलेक्ट्रोलिसीस’ तत्त्वाचा वापर करून त्यांनी हा प्रयोग प्रत्यक्षात उतरवलाय. यात पाण्यातील घटक असलेल्या हायड्रोजनचे ऑक्सिजनच्या साहाय्याने ज्वलन करून त्याचे वायुरूपात जतन केले जाते. त्यानंतर दुचाकीच्या पाठीमागे असलेल्या फुग्यांमध्ये जमा झालेल्या वायूच्या साहाय्याने इंजिन चालू होते. अन् दुचाकी वेग घेते. यासाठी पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करणारे तीन ‘हायड्रोजन सेल’ही याच मुलांनी तयार केलेले आहेत. गाडी सुरू झाल्यावर इंजिन स्वत:च बॅटरीला चार्ज करेल अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गाडी चालताना यातून कार्बनचे उत्सर्जन होत नसल्याचा त्यांवा दावा आहे. तर यातून पाण्याची वाफ बाहेर निघत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. एक लीटर खाऱ्या पाण्यात गाडी प्रतितास ४० किलोमीटर वेगाने तीन तास चालू शकते. वेग वाढविला तर तीन तासांचा वेळ कमी होऊ शकताे असेही या पाच युवकांनी स्पष्ट केले.
प्रयोगाचे संभाव्य फायदे
हायड्रोजन घटक असल्याने पेट्रोलपेक्षा तिप्पट परिणामकारक. वाढते इंधन आवश्यकता आणि दर याला आळा बसू शकेल. ‘कार्बन डायऑक्साइड’ऐवजी पाण्याची वाफ उत्सर्जित होत असल्याने पर्यावरणाचे आपोआप संवर्धन होईल. किफायतशीर दरात ग्राहकाला दुचाकीही उपलब्ध होऊ शकेल.
पेटंट मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर
या प्रयोगाचे पेटंट मिळविण्याची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती यश जायले व त्याच्या मित्रांनी दिली. या प्रयोगासाठी विद्यार्थ्यांना पैशांची कमी पडत असल्याची खंत त्यांनी बाेलून दाखविली. सरकार अन् समाजाने मदत केेेली तर हा प्रयोग ताकदीने समोर जाऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे. सर्व गोष्टी उपलब्ध झाल्या तर पाण्यावर चालणारी ही दुचाकी ६० ते ७० हजारांत उपलब्ध करून देण्याचे या विद्यार्थ्यांचे लक्ष्य आहे.