क्षारयुक्त पाणी उठले जीवावर: चतारी येथे किडणीच्या आजाराने आणखी एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:22 PM2020-02-28T12:22:02+5:302020-02-28T12:24:22+5:30
निलेश विश्वनाथ सदार (३३ ) असे या युवकाचे नाव असून, त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या.
अकोला : पातूर तालुक्यातील चतारी येथे गेल्या दहा वर्षांपासून किडनीच्या आजाराने थैमान घातले आहे. क्षारयुक्त पाणी येथील ग्रामस्थांच्या जीवावर उठले असून, दहा वर्षात २० जणांचा मृत्यू झाला तर गावातील २० ते २५ ग्रामस्थांवर उपचार सुरू आहेत. किडणीच्या विकारानेग्रस्त असलेल्या चतारी येथील आणखी एका युवकाचा गुरुवारी उपचारादरम्यान अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. निलेश विश्वनाथ सदार (३३ ) असे या युवकाचे नाव असून, त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या. अत्यंत हलाखीची परिस्थीत असलेल्या निलेश यांना पाच वर्षापूर्वी किडणीचा आजार जडला होता. या दरम्यान नसतानाही मुंबई, पुणे व नागपूर येथील रुग्णालयांमध्ये निलेशवर उपचार करण्यात आले. ऐपत नसतानाही लाखो रुपये उपचारावर खर्च झाले; परंतु कोणताही फरक पडला नाही. अखेर गत काही दिवसांपासून निलेश यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण, व आईवडील असा परिवार आहे.
दहा वर्षात २० जणांचा किडणी विकाराने मृत्यू
खारपाणपट्ट्यात येत असलेल्या चतारी येथे ग्रामपंचायतच्या योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. तुलंगा परिसरात असलेल्या एका विहिरीतील पाणी गावातील जलकुंभात साठवून ते ग्रामस्थांना वितरीत करण्यात येते. १० वर्षांपूर्वी या गावात किडनीच्या आजाराची लागण झाली. पोलीस पाटील विजय सरदार यांनी पाठपुरावा केल्यानंतर विहिरीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. या पाण्यात सिलीका आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने पिण्यासाठी वापरू नये, असा अहवाल नागपुरातील प्रयोगशाळेने दिला. तरीही दहा वर्षांपासून या गावात प्रशासनाने कुठलीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे २० ग्रामस्थांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला तर २० ते २५ जण महागडा उपचार करीत आहेत. गावात कुठेही कुपनलीका खोदल्यास क्षारयुक्त पाणी असल्याने ग्रामस्थांवर विहिरीच्या पाण्याशिवाय गत्यंतर नाही.