महात्मा गांधी, दाभोळकर हत्येसाठी वापरलेली ‘मोडस आॅपरेंडी’ एकच - तुषार गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 02:43 PM2019-07-10T14:43:33+5:302019-07-10T14:44:35+5:30
महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप तुषार गांधी यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली मोडस आॅपरेंडीच नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आली. वेगवेगळ्या स्तरावर टीम तयार करून या हत्या घडविण्यात आल्या. त्यामुळेच या हत्यामागे ज्या संस्थांची प्रेरणा अन् प्रोत्साहन होते तिथपर्यंत थेट पोहचता येत नाही, अशी खंत व्यक्त करून त्याचाच फायदा अशा हत्यामध्ये सहभागी संस्था घेत असून, ‘ते’ आम्ही नव्हेच अशा पद्धतीने आता राजकारण केले जात असल्याचा आरोप प्रख्यात लेखक तुषार गांधी यांनी केला.
महात्मा गांधी जन्मशताब्दीच्या निमित्ताने येथील शिवाजी महाविद्यालयात गांधी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे उपस्थित होते. तुषार गांधी पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग होता. राष्टÑीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांची प्रेरणा व प्रोत्साहन या हत्येसाठी होते, असा आरोप त्यांनी केला. गांधी हत्येनंतर कोर्टात खटला उभा राहिल्यावर पुराव्याअभावी या काहींची सुटका झाली असली तरी पुरावे कोर्टासमोर उपलब्ध होणार नाहीत असेच षडयंत्र या मागे रचले गेले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन ‘ते’ आम्ही नव्हेच अशा सांगणाऱ्या संस्था निर्दोषत्व सांगत असल्या तरी त्यांचीच प्रेरणा या हत्येमागे होती हे सिद्ध करण्यास कपूर आयोग महत्त्वाच ठरतो, असे ते म्हणाले. गांधी हत्येप्रमाणेच दाभोळकर यांची हत्या करण्यात आली. विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे यावर ज्यांचा विश्वास नाही अशा संस्थांचा या मध्ये सहभाग होता; मात्र हत्येसाठी वेगवेगळ्या पातळीवर नवनवीन व्यक्तींचा वापर झाल्याने या हत्येमागील षडयंत्रांची साखळी थेट एका संस्थेपर्यंत पोहचत नाही. मुंबईचा डॉन दाऊद इब्राहीमसुद्धा अशाच मोडस आॅपरेंडीमुळे पोलिसांच्या हाती लागला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
महात्मा गांधींनी या देशाला वैचारिक लढा लढण्याची ताकद दिली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात एखादे आंदोलन पुकारले की सर्व नेत्यांना अटक केली जात असे; मात्र जनता आंदोलनात कायम राहत गेल्याने स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला यामागे महात्मा गांधींनी दिलेला विचार होता, असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी सोबतच कस्तुरबा गांधी यांचेही योगदान तेवढेच तुल्यबळ आहे; मात्र इतिहासकारांनी अन् आमच्या परिवारानेही कस्तुरबांच्या कर्तृतवाची प्रभावी दखल घेतली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रख्यात कवी विठ्ठल वाघ, महादेवराव भुईभार, विजय विल्हेकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर तुषार गांधी यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. संचालन चंद्रकांत झटाले यांनी केले. तर प्राचार्य डॉ. भीसे यांनी आभार मानले.