एकाच हंगामात पिकांना अल्प आणि अतिवृष्टीचाही फटका
By admin | Published: August 13, 2015 10:55 PM2015-08-13T22:55:50+5:302015-08-13T22:55:50+5:30
पावसाच्या दडीने वाढ खुंटली, आता अतिपावसाने पिके पडताहेत पिवळी.
अकोला : पावसाने दिलेली एक महिन्याची दडी आणि या दडीनंतर सातत्याने सुरू असलेला पाऊस; परिणामी एकाच हंगामात अल्पवृष्टी आणि अतवृष्टीचाही फटका पिकांना सोसावा लागला आहे. पावसाने ऐन हंगामात तब्बल एक महिना दडी दिल्याने पिकांची वाढ खुंटली असून, आता सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. दोन्ही परिस्थितीमध्ये शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पावसाने एक महिना दडी दिली. पिकांना पाणी मिळाले नसल्यामुळे फांद्या व पानांची आवश्यक प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली व फुलोरा कमी प्रमाणात आला. त्यावेळी पिकांना पावसाची नितांत गरज होती. त्यामुळे शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत होते; मात्र पावसाने साथ दिली नाही. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आणि गत तेरा दिवसांमध्ये ४00 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे, त्याचा विपरीत परिणाम होऊन पिके पिवळी पडत आहेत. झाडांना आलेला फुलोरा पावसामुळे झडत आहे. त्यामुळे हा पाऊस पिकांसाठी नुकसानदायक ठरत आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे.; मात्र सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिके पिवळी पडत आहे. सोयाबीनवर उंट अळी व तंबाखूची पाने खाणार्या अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. शेतकर्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले. *विविध किडींचा हल्ला सोयाबीन पिकावर सध्या उंट अळी व तंबाखूची पाने खाणार्या अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. पिके लहान व झाडांना पाणी कमी असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी असला, तरी नुकसान मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता आहे.