केंद्राच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठीच साेमय्यांची ढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:28+5:302021-09-27T04:20:28+5:30
अकाेला : केंद्रातील माेदी सरकार हे शेतकरी, कामगार व बेराेजगारांच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहे. महागाईने सामान्य व्यक्ती हाेरपळून ...
अकाेला : केंद्रातील माेदी सरकार हे शेतकरी, कामगार व बेराेजगारांच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहे. महागाईने सामान्य व्यक्ती हाेरपळून निघत आहे. हे सर्व अपयश झाकण्यासाठीच भाजपाने प्रत्येक राज्यात किरीट साेमय्या यांच्यासारखी उपद्रवी माणसे पेरली आहेत. सामान्य जनतेचे लक्ष विचलित व्हावे याकरिताच साेमय्यांचा ढालीसारखा वापर केला जात असल्याचा आराेप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी ते अकाेल्यात दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. पटाेले म्हणाले की, विराेधक आराेप करत असतात. ताे त्यांच्या अधिकारच आहे. मात्र, साेमय्यांना समाेर करून भाजपाने खालच्या पातळीवरच राजकारण सुरू केले आहे. हा सर्व प्रकार केंद्रातील अपयश झाकण्यासाठीच असल्याचा घणाघात त्यांनी केला. दाेषींवर कारवाई झालीच पाहिजे. त्याची पाठराखण करण्याचा प्रश्नच नाही. मात्र, सुपारी घेतल्यासारखे आराेपांचे सुरू असलेले सत्र पाहता भाजपाची ही खेळी असल्याचेही ते म्हणाले. केंद्राचे अपयश जनतेपर्यंत पाेहोचविण्यासाठी उद्याच्या बंद माध्यमातून केंद्र सरकारविरोधात नवी लढाई सुरू करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून त्यांनी संबंधित कंपनीला जबाबदार धरले असून या प्रकारात दाेषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली असून विद्यार्थ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरींची खासदारकी जाईलच
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आपण उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतील पुराव्यांच्या आधारावर गडकरींची खासदारकी जाईल, असा पुनरूच्चार नाना पटोले यांनी केला. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते. पटोले जिल्हा परिषद पोटनिवडणूक प्रचारासाठी आज अकोला जिल्ह्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. गडकरींची याचिका बेकायदेशीर असल्याचा न्यायालयातील दावा चुकीचा असल्याचे पटोले म्हणाले. गडकरींशी वैयक्तिक मतभेद नाहीत. ही विचारांची लढाई असल्याचेही त्यांनी सांगितले.
ती भेट राजकीय शिष्टाचार
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण आणि बाळासाहेब थोरात फडणवीसांनाही भेटण्यात काहीच गैर नाही. निवडणूक बिनविराेध करण्यासाठी अशा भेटी हा राज शिष्टाचाराचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग रचनेत बदल हाेईल
महापालिकेसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेच्या विषयावर काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आमच्या प्रयत्न आलेल्या प्रतिक्रियांच्या ही जनभावना आहे. त्यामुळे आम्ही ठराव घेऊन द्विसदस्यीय प्रभाग रचना करण्याबाबत सरकारला विनंती केली आहे आणि तसा बदल हाेईल अशी खात्री असल्याचे पटाेले म्हणाले.