मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 05:36 PM2021-05-19T17:36:13+5:302021-05-19T17:36:19+5:30
Akola News : वन विभागाने या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा–गोरवा रस्त्यावरील शेताच्या बाजूस एका तलावाजवळ ६ मोर व ७ लांडोरी तसेच २ चिमण्या व ३ टिटव्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे वन विभागाने या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
पिंपळखुटा शेतशिवारात काही पक्षी आपोआपच मृतावस्थेत पडल्याची माहिती उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. व सहायक वनसंरक्षक वने सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी डांगे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तालुका पशुधन अधिकारी डॉ. वर्षा चोपडे, प्रभारी वनपाल पी. डी. पाटील यांचाही सहभाग होता. मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांची शिकार झाली की अज्ञात आजाराने त्यांचा मृत्यू झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करण्याकरिता ते फॉरेन्सिक लॅब हैदराबाद येथे पाठविण्यात आले आहे. या घटनास्थळावर गहू आढळून आले असून त्याचे सुद्धा नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना यांनी दिली आहे.