चाचणीसाठी १०४३ जणांनी दिले नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:20 AM2021-05-21T04:20:12+5:302021-05-21T04:20:12+5:30
आरटीपीसीआर चाचणीकडे नागरिकांची पाठ अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याचे अचूकरीत्या निदान व्हावे यासाठी आरटीपीसीआर चाचणीला ...
आरटीपीसीआर चाचणीकडे नागरिकांची पाठ
अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याचे अचूकरीत्या निदान व्हावे यासाठी आरटीपीसीआर चाचणीला प्राधान्य दिले जाते. परंतु, मागील काही दिवसांपासून या चाचणीचा अहवाल प्राप्त होण्यास दिरंगाई होत असल्याने संशयित रुग्णांनी रॅपिड अँटिजन चाचणी करण्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. आरटीपीसीआर चाचणी केल्यास त्याचा अहवाल तातडीने देण्याची मागणी केली जात आहे.
चाचणी केंद्रांमध्ये पाण्याची सुविधा नाहीच!
अकोला : महापालिका प्रशासनाच्या वतीने कस्तुरबा गांधी रुग्णालय, भारतीया रुग्णालयासह शहराच्या विविध दहा ठिकाणी असलेल्या नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण सुरू केले आहे. याठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागते. उन्हाची दाहकता लक्षात घेता चाचणी केंद्रांच्या ठिकाणी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
महापौरांकडून अग्निशमन विभागाची पाहणी
अकोला : शहरात १८ मे रोजी रात्री आलेल्या चक्रीवादळामुळे शहराच्या विविध भागांतील झाडे उन्मळून पडली होती. त्या अनुषंगाने महापौर अर्चना मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती संजय बडोणे, माजी नगरसेवक जयंत मसने यांनी अग्निशमन विभागात कार्यान्वित करण्यात आलेल्या आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी संभाव्य पावसाचे दिवस लक्षात घेता आवश्यक साहित्य खरेदी करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना दिले.
विद्युत खांब दुरुस्त केलेच नाहीत!
अकोला : शहरात १८ मे रोजी रात्री आलेल्या चक्रीवादळामुळे महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक लहान-मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने विद्युत खांब वाकले आहेत. त्यावरील विद्युत तारा तुटल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी शहरात ठिकठिकाणी वाकलेल्या विद्युत खांबांची दुरुस्ती होईल अशी अपेक्षा होती. परंतु, बहुतांश भागातील विद्युत खांब अद्यापही तसेच वाकलेले असल्याचे चित्र दिसून आले. याकडे महावितरण कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.
ऑनलाईन अपॉइंटमेंट; ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम
अकोला : केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार आता ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी मोबाईलद्वारे ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी सहा वाजता ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ होणार आहे. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे अत्याधुनिक मोबाईल नसल्यामुळे त्यांनी नोंदणी कशी करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पथदिवे बंद; गांधी रोड, डाबकी रोड अंधारात
अकोला : मागील तीन दिवसांपासून शहरातील मध्यभागी असलेल्या गांधी रोड भागातील तसेच डाबकी रोड परिसरातील मुख्य रस्त्यालगतचे पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर अंधार पसरत असल्यामुळे मोकाट कुत्र्यांना ऊत आला आहे. ही समस्या लक्षात घेता महापालिकेच्या विद्युत विभागाने तातडीने या दोन्ही मार्गांवरील पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.