अकोला शहरातील रस्ते कामांच्या नमुन्यांची होणार ‘इन कॅमेरा’ तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:49 PM2018-07-28T13:49:11+5:302018-07-28T13:51:40+5:30
अकोला : रस्ते कामांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार असून, व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरणात (इन कॅमेरा) नमुन्यांची तपासणी होणार आहे.
अकोला : शहरातील रस्ते कामांच्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल आॅडिट) गत सहा दिवसांच्या कालावधीत शहरातील रस्ते कामांचे नमुने घेण्याचे काम शुक्रवारी पूर्ण करण्यात आले. सहा दिवसांत सहा रस्ते कामांचे ७६ नमुने घेण्यात आले असून, घेण्यात आलेले नमुने सीलबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. रस्ते कामांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार असून, व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरणात (इन कॅमेरा) नमुन्यांची तपासणी होणार आहे.
शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी सामाजिक व तांत्रिक अंकेक्षण (आॅडिट) करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १६ जुलै रोजी काढले होते. त्यानुसार शहरातील रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी रस्ते कामांचे नमुने घेण्याचे काम २२ जुलैपासून सुरू करण्यात आले. नमुने घेण्याचे काम शुक्रवार, २७ जुलै रोजी पूर्ण करण्यात आले. सहा दिवसांत शहरातील रस्ते कामांचे तीन पथकांमार्फत घेण्यात आलेले ७६ नमुने सीलबंद करून, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. रस्ते कामांच्या या नमुन्यांची तपासणी शासकीय प्रयोगशाळेत संबंधित तज्ज्ञांच्या पथकांमार्फत करण्यात येणार आहे. नमुने तपासणीच्या कामाचे व्हिडिओ कमेराद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे.
‘या’ रस्ते कामांचे घेतले नमुने!
-मुख्य डाकघर ते सिव्हिल लाइन चौक.
-टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक .
-अग्रसेन चौक ते दुर्गा चौक .
-माळीपुरा ते मोहता मिल चौक .
-अशोक वाटिका ते सरकारी बगीचा.
-गोरक्षण रोड (नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालयपर्यंत)
शहरातील रस्ते कामांचे नमुने घेण्याचे काम शुक्रवारी पूर्ण करण्यात आले. तीन पथकांमार्फत सहा रस्ते कामांचे ७६ नमुने घेण्यात आले असून, ते सीलबंद करून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. घेण्यात आलेल्या नमुन्यांची तज्ज्ञांमार्फत प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॅमेराद्वारे चित्रीकरणात तपासणीचे काम करण्यात येणार आहे.
-डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी