आरोग्य केंद्रांच्या बांधकाम, दुरुस्ती कामांना मंजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:42 AM2021-09-02T04:42:00+5:302021-09-02T04:42:00+5:30
अकोला : जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २४ आरोग्य उपकेंद्रांमध्ये नवीन बांधकामांसह आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीच्या कामांना जिल्हा परिषद ...
अकोला : जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २४ आरोग्य उपकेंद्रांमध्ये नवीन बांधकामांसह आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीच्या कामांना जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या सभेत बुधवारी मंजुरी देण्यात आली.
जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २४ उपकेंद्रांमध्ये आवारभिंत, प्रसूतिगृह, टिनशेड, पेव्हर्स आदी ८ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन बांधकामे तसेच २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र दुरुस्तीची कामे करण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या विद्युत नूतनीकरणाच्या कामांनाही मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला समिती सदस्य पुष्पा इंगळे, अर्चना राऊत, प्रगती दांदळे, डॉ. गणेश बोबडे, गोपाल भटकर, अनंत अवचार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले उपस्थित होते.
दुर्धर आजार रुग्णांचे ४१ अर्ज
प्रलंबित; कारवाईचे निर्देश!
दुर्धर आजार रुग्णांना आर्थिक मदत योजनेंतर्गत पातूर तालुक्यातील आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दुर्धर रुग्णांचे ४१ अर्ज अद्याप प्रलंबित असल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानुषंगाने जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.
…...........
कामात हलगर्जी; विद्युत अभियंत्यावर कारवाई करा!
आलेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील विद्युतव्यवस्था नादुरुत असताना व्यवस्थित असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या संबंधित विद्युत अभियंत्याकडून देण्यात आली. त्यामुळे आरोग्य केंद्रांतील विद्युत नूतनीकरण कामांच्या यादीत या आरोग्य केंद्राचा समावेश होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार संबंधित विद्युत अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी समिती सदस्य अर्चना राऊत यांनी सभेत केली. त्यानुसार यासंबंधीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे निर्देश सभेत देण्यात आले.