अभयारण्यालगतचा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र

By admin | Published: February 16, 2016 12:59 AM2016-02-16T00:59:29+5:302016-02-16T00:59:29+5:30

लोणार सरोवरालगतच्या १00 मीटर परिसरात खोदकामासह बांधकामावर येणार बंदी.

Sanctuary area is susceptible to the area | अभयारण्यालगतचा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र

अभयारण्यालगतचा परिसर अतिसंवेदनशील क्षेत्र

Next

मयूर गोलेच्छा/लोणार : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरालगतच्या ३८३.२२ हेक्टर परिसराला राज्यातील सर्वात लहान वन्य जीव अभयारण्य म्हणून घोषित केले असून, आता पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोणातून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २0 नोव्हेंबर २0१५ रोजी वन्य जीव अभयारण्याच्या चारही बाजूचा १00 मीटरचा परिसर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार अतिसंवेदशील म्हणून घोषित करण्यासाठी अधिसूचना काढलेली आहे. यामुळे सरोवरालगतच्या अतिसंवेदनशील क्षेत्रातील १00 मीटर परिसरात कुठल्याही प्रकारचे खोदकाम, नवीन बांधकाम, वृक्षतोड, ध्वनिप्रदूषण, प्लास्टिक वापरावरही बंदी घातली असून, ही अधिसूचना १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या लोणारच्या दक्षिणेस पाच लाख वर्षांपूर्वी उल्कापातामुळे वैशिष्ट्यपूर्ण खार्‍या पाण्याच्या सरोवराची निर्मिती झाली होती. सरोवरालगतच्या घनदाट जंगलात अनेक वन्य प्राणी वास्तव्यास असल्याकारणाने वनविभागाने ८ जून २000 साली सरोवरालगतच्या परिसराला राज्यातील सर्वात लहान वन्य जीव अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्यात बिबट, लांडगा, कोल्हा, तडस, माकड, जंगली मांजरसह अनेक प्रकारचे वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे वास्तव्य आहे. तसेच अंजन, अशोक, चंदन, बहेडा, बेल, पळस यासारख्या दुर्मीळ वनौषधी वनस्पतीही आढळून येतात. सरोवरातील अभयारण्य परिसरात अनेक पुरातन मंदिरे असून, सरोवरातील या सर्व घटकांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यामुळे जगभरातील संशोधकांना लोणार सरोवर आणि लगतचा परिसर संशोधनाकरिता नेहमीच आपल्याकडे मोहित करतो. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या सरोवरातील अवशेष लगतच्या १00 मीटर परिसरात विखुरलेले आहेत.
संशोधनात्मकदृष्ट्या हा परिसर अधिक महत्त्वपूर्ण असल्याकारणाने सरोवरलगतच्या चारही बाजूने १00 मीटरचा परिसर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतला असून, त्याआधी पर्यावरण विभागाने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. याकरिता राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या सक्षम अधिकार्‍यांकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. यामध्ये राज्य शासनाच्या पर्यावरण, वन, नगरविकास, पर्यटन, नगरपालिका, महसूल, कृषी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे आणि नगर रचनाकार या सर्व विभागांच्या सूचनांचा विचार केल्या जाणार आहे.

अतिसंवेदनशील क्षेत्रात या कामांवर येणार बंदी
पर्यावरणाचे संरक्षण होण्याकरिता सरोवरलगतच्या अतिसंवेदशील क्षेत्रातील १00 मीटर परिसरात भविष्यात गौण खनिज उत्खनन, खोदकाम, आरामशीनची निर्मिती, पर्यावरणाला हानी पोहोचविणार्‍या पदार्थांची निर्मिती उद्योग, जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे उद्योग, प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर, नवीन हॉटेल तसेच घरांचे बांधकाम, वृक्षतोड, रासायनिक शेती यावर पूर्णत: बंदी येणार आहे.

Web Title: Sanctuary area is susceptible to the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.