मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:31 AM2020-10-05T10:31:41+5:302020-10-05T10:32:00+5:30
Sand boa Snake मांडूळ जातीचा साप शाकीर खान चांद खान याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर येथील अहमदनगर परिसरातील एक जण मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करून या सापाची विक्रीसाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असताना या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या मांडूळ जातीचा साप बाळापूर येथील आबाद नगरातील रहिवासी शाकीर खान चांद खान याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी त्यास अटक केली.
बाळापुरातील शाकीर खान चांद खान याच्याकडे मांडूळ जातीचा साप असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या एका बॅगमध्ये दुर्मीळ मांडूळ जातीचा साप आढळला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने मांडूळ जातीचा साप असल्याचे सांगत विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे कबूल केले. पोलिसांनी या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, सदाशिव सुरडकर, रफिक, माजीद, रवी व एजाज यांनी केली.