वाळू, मातीची अवैध वाहतूक; तीन वाहने जप्त; ४.३७ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:41 PM2019-01-30T12:41:37+5:302019-01-30T12:42:05+5:30
अकोला : बाळापूर तालुक्यातील कसुरा घाटात वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व हातरुण येथे मातीची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक अशी तीन वाहने जप्त करून, वाहन मालकांना ४ लाख ३७ हजार ६६ रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी पथकाने मंगळवारी पहाटे केली.

जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांच्या नेतृत्वातील पथक गस्तीवर असताना बाळापूर तालुक्यातील कसुरा घाटात वाळूचे अवैध उत्खनन करून वाळूची अवैध वाहतूक करताना एमएच ४५ एस ५७०८ व एमएच २८ बी १४७७ या क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर आढळून आले. त्यामुळे दोन्ही टॅÑक्टर जप्त करण्यात आले, तसेच हातरुण येथे मातीची अवैध वाहतूक करताना एमएच ३१ एम ५२७४ क्रमांकाचा ट्रक आढळला. माती वाहतुकीसंदर्भात रॉयल्टी पावतीची तपासणी करण्यात आली असता, रॉयल्टी पावतीवर तारीख नमूद केली नसल्याचे आढळून आल्याने संबंधित ट्रक जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेली तीनही वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली असून, वाहन मालकांना एकूण ४ लाख ३७ हजार ६६ रुपये दंड आकारण्यात आला. त्यामध्ये दोन ट्रक्टर मालकांना २ लाख ३१ हजार ६६६ रुपये आणि ट्रक मालकास २ लाख ५ हजार ४०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.