निवडणुकीच्या लगबगीत वाळू माफियांची चांदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:18 PM2019-04-05T16:18:57+5:302019-04-05T16:19:09+5:30
अकोला: जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या लगबगीत वाळूची अवैध वाहतूक आणि विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफिया स्वत:ची चांदी करून घेत असताना, त्याकडे मात्र महसूल प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.
यावर्षी जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ५८ वाळू घाटांचा लिलाव प्रस्तावित आहे. त्यापैकी मार्च अखेरपर्यंत केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला आहे, तर शासकीय यंत्रणांच्या कामांसाठी नऊ वाळू घाट राखीव ठेवण्यात आले आहेत. लिलाव करण्यात आलेल्या ११ वाळू घाटांतून संबंधित लिलावधारकाकडून वाळूचा उपसा अद्याप सुरू करण्यात आला नसला, तरी जिल्ह्यातील सर्वच वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक करून वाळू विक्रीचा गोरखधंदा वाळू माफियांकडून जोरात सुरू आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, वाळू घाटांमध्ये अवैध उत्खनन, अवैध वाहतूक आणि अवैध वाळू विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफिया स्वत:ची चांदी करून घेण्यात गुंतले असताना, या प्रकाराकडे जिल्हा महसूल प्रशासनाकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे वास्तव आहे.
लिलाव करण्यात आलेले
असे आहेत ११ वाळू घाट!
अकोला तालुका : ब्रम्हपुरी, टाकळी पोटे, एकलारा, रोहणा, कपिलेश्वर, दहीहांडा.
अकोट तालुका : भोड, खिरकुंड बु., केळीवेळी.
पातूर तालुका : तुलंगा खुर्द.
मूर्तिजापूर तालुका : लाखपुरी.
शासनाच्या महसुलास चुना!
जिल्ह्यात लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात वाळूची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याने, वाळू घाटांच्या लिलावातून शासनाच्या खात्यात जमा होणाऱ्या महसुलास चुना लागत आहे. दुसरीकडे वाळू माफियांची मात्र चांदी होत आहे.
पाच कोटींचा
महसूल बुडणार?
गतवर्षी जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावातून ७ कोटी ५६ लाख रुपयांचा महसूल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. यावर्षी ११ वाळू घाटांच्या लिलावातून केवळ २ कोटी ४७ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याने, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी वाळू घाटांच्या लिलवातून मिळणारा ५ कोटी ९ लाख रुपयांचा महसूल बुडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
कारवाईकडे कानाडोळा !
जिल्ह्यात वाळूचे अवैध उत्खनन, अवैध वाहतूक जोरात सुरू असताना, यासंदर्भात कारवाई करण्याच्या कामाकडे जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून कानाडोळा करण्यात येत असल्याचे असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, त्याद्वारे २ कोटी ४६ लाख ५७ हजार ७३२ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. नऊ वाळू घाट शासकीय यंत्रणांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
-डॉ. अतुल दोड,
जिल्हा खनिकर्म अधिकारी.