अनाथ, निराधारांचा स्नेह संगम सोहळा ११ नोव्हेंबरला अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:51 PM2018-10-01T13:51:05+5:302018-10-01T13:52:17+5:30
अकोला: उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रमाच्या स्नेह संगम सोहळ्याचे आयोजन रविवार, ११ नोव्हेंबर रोजी अकोला येथे आयोजित केला आहे.
अकोला: उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रमाच्या स्नेह संगम सोहळ्याचे आयोजन रविवार, ११ नोव्हेंबर रोजी अकोला येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी, साध्वी ऋतुंभरादेवी, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, अंजनगाव सुर्जीचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे, बालहक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती विहिंपचे प्रांत सेवा प्रमुख तथा गायत्री बालिकाश्रमचे सचिव गणेश काळकर यांनी दिली.
विदर्भ चेंबर्स आॅफ कॉमर्स सभागृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत स्नेह संगम सोहळ्याची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत काळकर बोलत होते. शून्य ते सहा वर्षांपर्यंतच्या निराधार अनाथ बालकांचे संगोपन व दत्तक विधानासाठी अकोला-वाशिम जिल्ह्यात एकमेव मान्यता प्राप्त उत्कर्ष शिशुगृहाचे कार्य सुरू असून, शिशूसोबतच गायत्री बालिकाश्रम ही निराधार व निराश्रित मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करीत आहे. उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रम या दोन संस्थेत २० नवजात शिशू व १०० बालिकांचे योग्य पद्धतीने संगोपन होत आहे. आठ वर्षांपासून या संस्थेच्यावतीने ८६ नवजात शिशूंना माता-पित्यांचे छत्र देऊन त्यांचे जीवन सुरक्षित व सुखकर करण्याचा प्रयत्न केला. अशा बालकांना प्रेरणादायी जीवन बहाल करणाऱ्या मान्यवरांच्या सत्काराचे भारतात प्रथमच औचित्य साधून, संस्थेच्यावतीने प्रथमच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरात स्नेह संगम सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे काळकर यांनी सांगितले.
सोहळ्याचा प्रारंभ मातृत्व जागरण सप्ताहाच्या निमित्ताने नवरात्रात ९ ते १८ आॅक्टोबरपर्यंत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन बालक दत्तक घेण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. याशिवाय विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्य सोहळा रविवार, ११ नोव्हेंबर रोजी शुभमंगल कार्यालय व गोरक्षण संस्था प्रांगण गोरक्षण रोड येथे होणार आहे. देशात प्रथमच अनाथांचे स्नेहसंमेलन अकोल्यात आयोजित होत आहे. स्वागत समितीचे अध्यक्ष ब्रीजमोहन चितलांगे, खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, गोपाल खंडेलवाल, नंदू देशपांडे, मधुकर दीक्षित यांचा समावेश असल्याचे काळकर यांनी सांगितले.