सेमी इंग्रजीतून शिक्षण देणारी एकमेव सांगळूद जि.प. शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:32 PM2020-02-03T12:32:27+5:302020-02-03T12:32:45+5:30
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीतून शिक्षण दिले जाते.
अकोला : इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमध्ये आता दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. त्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ओढा जि.प. शाळांकडे वळत आहे. सांगळुद येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा ही जिल्ह्यात सेमी इंग्रजीतून शिक्षण देणारी एकमेव शाळा आहे. या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार, विभागातून संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट असताना, काही ठिकाणच्या शिक्षकांनी मेहनत घेऊन शाळांचा दर्जा उंचावला आहे. त्यापैकी एक सांगळुद येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा आहे. या शाळेतील शिक्षकांनी कल्पकतेने आणि आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण नाहीतर शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून शाळा नावारूपास आणली आहे. शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीतून शिक्षण दिले जाते. दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात असल्याने, शाळेला नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र मिळाले आहे. तसेच शाळेमध्ये स्वतंत्र संगणक लॅब आहे. यासोबतच विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेच्या परिसरात परसबाग फुलविली आहे. या परसबागेत पालक, मेथी, वांगे, कोथींबीर पिकवल्या जातात. हा भाजीपाला विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वापरल्या जातो. एवढेच नाहीतर शाळेला ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळते. ग्रामस्थांकडून टीनपत्रे, पेवर्स ब्लॉक आदी साहित्य लोकसहभागातून दिले जाते. शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षक विजय वाकोडे, शिल्पा तायडे, गणेश अत्तरकार, ललिता देशमुख, वंदना वाहुरवाघ, प्रमोद जढाळ, शारदा भरणे, सरपंच रूपाली तायडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य भास्करराव देशमुख, उपसरपंच महेंद्र काळे सातत्याने प्रयत्नशील असतात. २0 जानेवारी रोजी आमदार डॉ. रणजित पाटील यांच्या पुढाकारातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. विविधांगी उपक्रमांमुळे सांगळुदची जि.प. शाळा नावारूपास आली आहे.
शासनाने शाळांमध्ये वॉटर बेल उपक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. सांगळुद येथील जि.प. शाळा वॉटर बेल उपक्रम राबविणारी जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी तीनदा सुटी देण्यात येते. यासोबतच शाळेत गांडूळ खताची सुद्धा निर्मिती करण्यात येते. खरी कमाई उपक्रमातर्गंत विद्यार्थ्यांना आनंद मेळावा आयोजित केला जातो.
विविध उपक्रम राबवित असल्याने, शाळेला आदर्श शाळा पुरस्कार, स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला, पालक, ग्रामस्थांकडून नेहमीच सहकार्य मिळते.
-नितीन बंडावार, केंद्र प्रमुख
-केशव गावंडे, मुख्याध्यापक
पाल्याला इंग्रजी शिक्षण,व्यावहारिक ज्ञान शाळेत मिळते. त्यामुळेच शाळा आदर्श ठरली आहे. शिक्षक सुद्धा तळमळीने विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात.
-राहुल सिरसाट, पालक व
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती