‘सॅनेटरी पॅड ’ निर्मितीतून महिलांनी साधला उन्नतीचा मार्ग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:09 PM2019-12-29T12:09:27+5:302019-12-29T12:09:49+5:30
व्याळा येथील महिला बचत गटाच्या महिलांनी ‘सॅनेटरी पॅड’ निर्मितीतून उन्नतीचा मार्ग साधला आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मासिक पाळी, या विषयावर आजही शहरी भागातील बहुतांशमहिला थेट बोलण्यास टाळतात. ग्रामीण भागात तर या विषयावर बोलणेही कठीणच; पण याच विषयावर जनजागृती करत व्याळा येथील महिला बचत गटाच्या महिलांनी ‘सॅनेटरी पॅड’ निर्मितीतून उन्नतीचा मार्ग साधला आहे.
अकोला शहरापासून जवळच असलेल्या व्याळा येथील काही महिलांनी दोन वर्षांपूर्वी योगीराज स्वयंसहायता महिला बचत गटाची स्थापना केली. सुरुवातीला केवळ पैशांची बचत म्हणून महिलांचा हा गट चालायचा; पण त्या पलिकडेही महिलांचं वेगळं जग आहे, हे जिल्हा उद्योग केंद्राच्या एका बैठकीतून या महिलांना कळलं. बचत गटाच्या माध्यमातून केवळ पैशांची बचतच नाही, तर विविध उद्योगही करणे शक्य असल्याचं समजलं. या बैठकीत महिलांना कापूस वेचणी यंत्र, चरखा, शिलाई मशीन यांसह विविध गृह उद्योगांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी व्याळा योगीराज स्वयंसहायता महिला बचत गटाची ‘सॅनेटरी पॅड’ निर्मिती प्रशिक्षणासाठी निवड झाली. दोन दिवसांच्या प्रशिक्षणासोबतच जिल्हा उद्योग केंद्रांतर्गत महिला बचत गटाला सॅनेटरी पॅड निर्मितीचे यंत्र उपलब्ध करून दिले.
‘ईश्वर चिठ्ठी’ने उघडले नशीब
जिल्हा उद्योग केंद्र येथे झालेल्या बैठकीत ईश्वर चिठ्ठी टाकून विविध उद्योगांच्या प्रशिक्षणासाठी महिला बचत गटांची निवड करण्यात आली. यावेळी व्याळा येथील योगीराज स्वयंसहायता महिला बचत गटाची निवड सॅनेटरी पॅड निर्मितीसाठी झाली. प्रशिक्षणानंतर या महिलांनी सॅनेटरी पॅड निर्मितीला सुरुवात केली अन् त्यांचे नशीबच उघडले.
चूल सांभाळून चालतो उद्योग
बचत गटाने व्याळा गावातच एक खोली भाड्याने घेऊन सॅनेटरी पॅडच्या निर्मितीला सुरुवात केली. चार-चार महिलांचे दोन गट तयार करून एक दिवसाआड हे दोन्ही गट आळीपाळीने एक एक दिवस पॅड निर्मितीचे कार्य करतात. त्यामुळे चूल सांभाळून हा उद्योग सांभाळणेही शक्य झाले आहे. शिवाय, या महिला गावागावात जावून महिला आरोग्यविषयक जनजागृती करून महिलांना सॅनेटरी पॅडचा वापर करण्याचे आवाहन करत आहेत.
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पॅड निर्मितीचे प्रशिक्षण मिळाल्याने हाताला रोजगार मिळाला. शिवाय, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जनजागृतीचीदेखील संधी मिळाली आहे. त्यामुळे शहरातच नाही, तर गावातील महिलाही आता सॅनेटरी पॅडचा उपयोग करू लागल्या आहेत.
- सावित्री दीपक सोळंके,
अध्यक्ष, योगीराज स्वयंसहाय्यता महिला बचत गट, व्याळा, जि. अकोला.