पाण्याचे सूक्ष्म व्यवस्थापनच भविष्यात तारणार- संजय बेलसरे
By admin | Published: September 25, 2015 01:04 AM2015-09-25T01:04:21+5:302015-09-25T01:04:21+5:30
अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिवस साजरा.
अकोला: जगात सर्वाधिक पाण्याचा साठा आपल्याकडे आहे; परंतु या पाण्याचा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याने पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पाणीसाठय़ाचे सूक्ष्म व्यवस्थापन करण्यासोबतच पाण्याचे मूलस्थानी जलसंधारण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे उपसचिव डॉ. संजय बेलसरे यांनी गुरुवारी येथे केले. अकोला अभियंता व वास्तुविद् संघटना आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलाजी अकोलाच्यावतीने गुरुवार, २४ सप्टेंबरला अभियंता दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बेलसरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके होते. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, आमदार रणधीर सावरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता गणेश गोखले, महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के. देशमुख, संजीव जैन, काशीनाथ खडसे, व्ही.एस. जामोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बेलसरे यांनी या प्रसंगी एका चित्रफितीद्वारे जगातील पाण्याची उपलब्धता आणि नियोजन, या माहितीसह आपल्याकडे वापर होत असलेल्या पाण्याची तुलनात्मक माहिती दिली. अँड. शेळके यांनी अभियांत्रिकी क्षेत्राला अवकळा आली असल्याची वास्तविकता मांडताना, अभियांत्रिकीला चांगले दिवस आणण्याची जबाबदारी अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणार्या प्रत्येक अभियंत्याची असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. अभियांत्रिकीला पारंपरिक इतिहास आहे. अभियंत्यांनीच देश सुंदर केला आहे. देशात सर्व मुबलक आहे. या सर्व संसाधनांनी देश समृद्ध, श्रीमंत आहे; पण लोक गरीब आहेत. का गरीब आहेत? याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे सांगत, अभियंत्यांमध्ये हे गतवैभव प्राप्त करण्याची ताकद असल्याचे ते म्हणाले. आमदार सावरकर यांनी याच महाविद्यालयात शिक्षण घेतले असल्याचे सांगताना अनेक मजेदार किस्से सांगितले. अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणार्या या भागातील विद्यार्थ्यांना याच भागात कामे मिळण्याची गरज आहे. त्यासाठी या भागात मोठी औद्योगिक वसाहत, प्रक्रिया उद्योग, कापूस उद्योग उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. परंतु, याबाबतीत विदर्भ मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अकोल्यातील रस्ते बांधकाम सुरू असताना या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्या रस्त्यांचे अवलोकन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रसंगी विविध विषय, खेळात प्रावीण्य प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन झामरे यांनी, तर आभार प्रदर्शन मालोकार यांनी केले.