संजय धोत्रे, भावना गवळी मंत्रिपदाचे दावेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:04 PM2019-05-25T13:04:09+5:302019-05-25T13:04:54+5:30
भावना गवळी व संजय धोत्रे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने विक्रमी विजय प्रस्थापित केल्यानंतर आता मंत्रिमंडळाच्या स्थापनेबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा तसेच यवतमाळ-वाशिम या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत युतीची लाट कायम राहिली. या मतदारसंघातून विजयी झालेले तिन्ही खासदार मंत्रिपदाचे दावेदार असले तरी भावना गवळी व संजय धोत्रे यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात विदर्भातून नितीन गडकरी व हंसराज अहिर यांना संधी मिळाली होती. या निवडणुकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहिर यांचा पराभव झाला आहे. या पृष्ठभूमीवर आता मंत्रिमंडळातील प्रवेशासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांमध्ये पश्चिम विदर्भाला संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी या पाचव्यांदा विजयी झाल्या आहेत. पश्चिम वºहाडात सर्वाधिक वेळा सलग विजयी होणाऱ्या खासदार म्हणून त्यांचा विक्रम आहे, तर अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सलग चौथा विजय मिळून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या दोन्ही खासदारांची सांसदीय कारकीर्द लक्षात घेता त्यांचा मंत्रिपदासाठी प्रबळ दावा आहे.
माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ हेसुद्धा पराभूत झाल्याने शिवसेनेकडे भावना गवळी यांच्या नावाचा सक्षम पर्याय आहे. ज्येष्ठ सदस्यासह महिला खासदार म्हणून त्यांना प्रतिनिधित्व मिळाल्यास पश्चिम विदर्भात सेनेची ताकद वाढण्यास मदतच होणार आहे.
संजय धोत्रे यांना निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून या पदाला राज्य शासनाच्या ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे; मात्र धोत्रे यांचा अनुभव अन् दीर्घ सांसदीय कारकीर्द पाहता त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्यक्ष समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या नेतृत्वात अकोल्यातील जिल्हा परिषद वगळली तर सर्व सत्ता केंद्र भाजपाने जिंकली असल्याने धोत्रे यांचा दावा प्रबळ असून, त्यांचे मंत्रिपद अमरावती विभागामध्ये भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते.