संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अकोला उपकेंद्रलवकरच होणार
By Admin | Published: March 18, 2015 01:44 AM2015-03-18T01:44:21+5:302015-03-18T01:44:21+5:30
आकाश फुंडकर यांनी वेधले लक्ष; विनोद तावडे यांची ग्वाही.
खामगाव (जि. बुलडाणा): अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांंना आनंदाची बातमी म्हणजे त्यांचे अमरावती जाण्याचे हेलपाटे येणार्या काही दिवसात थांबणार आहेत. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.अँड. आकाश फुंडकर यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे करण्याच्या केलेल्या मागणीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात होकार दिला आहे. मुंबई येथे सुरू असलेल्या २0१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १७ मार्च रोजी विधानसभा सभागृहात पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान ना. तावडे यांनी अकोला उपकेंद्र करणार असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून मागणी करीत असलेल्या विद्यार्थी व सामाजिक संस्था, संघटनांना मोठा दिलासा मिळाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना १ मे १९८३ साली झाली. या विद्यापीठांतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. स्थापनेनंतर या विद्या पीठाचे अकोला येथे अतिरिक्त उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. परीक्षा फॉर्म, शुल्क व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांंना अमरावती गाठावे लागते. साध्या छोट्याशा त्रुटींकरिता विद्यार्थ्यांंना विद्यापीठात जावे लागते. विद्यार्थ्यांंना सुमारे २00 ते २५0 किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांंचे एक-दोन दिवस छोट्याशा कामाकरिता वाया घालावे लागतात. यामुळे त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसानही होत आहे. यासाठी अमरावती विद्यापीठाचे अकोला येथे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांंपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व इतर सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने सुरू होती. दरम्यान, मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विद्यार्थ्यांंची ही समस्या खामगावचे युवा आ.अँड. आकाश फुंडकर यांनी सभागृहात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांच्याकडे केली. शिक्षण विभागाच्या पूरक मागण्यांवर सभागृहात १७ मार्च रोजी चर्चा करण्यात आली असता या मागणीला ना. तावडे यांनी सकारात्मक उत्तर देत अकोला येथे विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.