संत गाडगेबाबा चषक कुस्ती स्पर्धा : मानाच्या चांदीच्या गदासाठी झुंजले मल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:45 PM2019-05-31T12:45:31+5:302019-05-31T12:46:22+5:30
अकोला: जुने शहरातील शिवाजी नगर चौक गुरुवारी सायंकाळी कुस्तीप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता
- नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: जुने शहरातील शिवाजी नगर चौक गुरुवारी सायंकाळी कुस्तीप्रेमींच्या गर्दीने फुलून गेला होता. निमित्त होते श्री संत गाडगेबाबा चषक विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचे. यामध्ये विदर्भातील नामवंत मल्लांनी सहभाग घेतला होता. चित्तथरारक व उत्कंठापूर्ण लढती होत असल्याने कुस्तीप्रेमीच नव्हे, तर नागरिकांचे पायदेखील तेथून उचलवत नव्हते. रात्री उशिरापर्यंत स्पर्धेतील लढती झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन जुन्या पिढीतील नामवंत मल्ल रमेश मोहोकार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सावजी, जयंत सरदेशपांडे, रवींद्र गोतमारे, किशोर औतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व लढतींचे धावते समालोचन वस्ताद राजेंद्र गोतमारे यांनी केले. स्पर्धेत ४७ महिला आणि १२० पुरुष मल्लांनी सहभाग घेतला. पुसद, वाशिम, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि यजमान अकोला येथील कुस्तीगीरांचा स्पर्धेत भरणा होता. शिवाजी नगर चौकात स्पर्धा स्थळ तयार करण्यात आले होते. कुस्त्या मॅटवर खेळविण्यात आल्या. दुपारी सहभागी मल्लांची वजन व आरोग्य तपासणी करण्यात आली.
महिलांच्या गटातील लढतींनी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. ३५ किलो वजनगटात स्नेहल बमन, ४० किलो वजनगटात नालंदा दामोदर, ४५ किलो कविता राठोड, ५० किलो वजनगटात वैष्णवी कोटरवार हिने विजय मिळविला. खुल्या गटामध्ये साक्षी माळी आणि प्रेरणा अरू ळकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. रोमांचक झालेल्या या लढतीमध्ये साक्षी माळीने ६-४ अशा गुणांनी विजेतेपद मिळविले. साक्षीला तीन हजार तर प्रेरणाला दीड हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सर्व गटातील विजेता आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. याशिवाय नागरिकांनी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी वैयक्तिक रोख पारितोषिकांची लयलूट केली. पुरुषांच्या विभागातील कुमार, वरिष्ठ आणि खुल्या गटातील लढती रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. मानाची गदा कोण जिंकते, यासाठी नागरिकांमध्ये पैज लागली होती. बऱ्याच वर्षांनी अकोल्यात खुली कुस्ती स्पर्धा झाल्यामुळे जुने शहरात उत्साहाचे वातावरण पसरले होते. स्पर्धा मुख्य आयोजक राजेंद्र गोतमारे व नाना गोसावी यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. स्पर्धेत पंच म्हणून महेंद्र मलिये, शिवा सिरसाट, कुणाल माधवे यांनी काम पाहिले. स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार घेण्यात आली.
जुन्या पिढीतील मल्लांची सलामी
अकोला हे पहिलवानांचे शहर म्हणून पूर्वी ओळख होती. आज ही ओळख धूसर होत आहे; मात्र गुरुवारी गाडगेबाबा चषक कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या पिढीतील नामवंतांनी हजेरी लावून चांदीची गदा धरू न मैदानाला चौफेर सलामी दिली. विदर्भ केसरी नजीर पहिलवान, बंडू चांदुरकर, ओंकार मुळे, रमेश मोहकार, बंडू बुलबुले, रतन इचे, विजय नागरलकर, राजू भिरड, किशोर औतकर, रू पलाल मलिये, नारायण वाडेकर आदी पहिलवानांनी हजेरी लावून विदर्भातील नवोदित मल्लांना आशीर्वाद दिला.