पालखी निघाली..,भक्तासंगे गजानन माऊली निघाली; श्रींच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन
By नितिन गव्हाळे | Published: June 13, 2024 10:42 PM2024-06-13T22:42:19+5:302024-06-13T22:42:36+5:30
श्रींच्या पालखीचे स्वागत व रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात राहील. भक्तांना श्रींचे दर्शन व्हावे म्हणून अकोला शहराच्या मुख्य रस्त्याने श्रींच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
अकोला : भजनी मंडळ, टाकळकरी, दिंडी, अश्व व ७०० वारकऱ्यांसह शेगाव येथून संत श्री गजानन महाराजांच्या पालखी १३ जून रोजी दुपारी निघाली असून, ही पालखी नागझरी येथे पोहोचली असून, तेथून पालखी अकोला जिल्ह्यातील पारस येथे दाखल होईल. तेथून भौरद येथे १४ जूपन रोजी मुक्काम करून श्रींच्या पालखीचे शनिवार, १५ जून रोजी सकाळी ७:०० वाजता राजराजेश्वरनगरात आगमन होणार आहे.
श्रींच्या पालखीचे स्वागत व रात्रीचा मुक्काम मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात राहील. भक्तांना श्रींचे दर्शन व्हावे म्हणून अकोला शहराच्या मुख्य रस्त्याने श्रींच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. १५ जून रोजी दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत मुंगीलाल बाजोरिया विद्यालय ग्राउंडवर श्रींच्या दर्शनाची व्यवस्था आहे.
...असा राहील शोभायात्रेचा मार्ग
१५ जून रोजी अकोला शहरातील शोभायात्रेचा मार्ग श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिलेल्या शहरातील मुख्य रस्त्यानेच शोभायात्रा खालीलप्रमाणे निघणार आहे. सकाळी ११:०० वाजता श्रींचे पालखी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोले प्लॉट जुने शहर येथून निघेल. डाबकी रोड, श्रीवास्तव चौक, विठ्ठल रुक्माई मंदिर, सिटी कोतवाली चौक, गांधी रोड, चिव चिव बाजार येथून मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगण येथे पालखीचा मुक्काम राहील.
रविवारी हरिहरपेठेत मुक्काम
१६ जून २०२४ रोजी परतीचा मार्ग सकाळी ६:०० वाजता जिल्हाधिकारी निवासमोरून, वन विभाग कार्यालय, खंडेलवाल भवन मार्गे गोरक्षण रोड, आदर्श कॉलनी शाळा क्रमांक १६ येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाचे वितरणानंतर संभाजीनगर, सिंधी कॅम्प मेन रोड,कारागृह समोरून, मेन हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक, राजराजेश्वर मंदिर समोरून, हरिहर पेठमधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाऊन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहतील.