भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्याला सरपंचाने केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:33 AM2021-02-06T04:33:33+5:302021-02-06T04:33:33+5:30
खेट्री: पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत अंधारसांगवी येथे भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करणाऱ्या युवकाला सरपंच व त्याच्या दोन भावांनी मारहाण ...
खेट्री: पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत अंधारसांगवी येथे भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करणाऱ्या युवकाला सरपंच व त्याच्या दोन भावांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी ५ फेब्रुवारी रोजीच्या सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीच्या घटनेमध्ये अंधारसांगवी येथील तरुण जखमी झाला आहे.
अंधारसांगवी येथे समाज मंदिराचे बांधकाम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला होता. त्या निवेदनामध्ये अंधारसंगवी येथील सुदर्शन मधुकर ताजणे यांची स्वाक्षरी होती. या कारणावरून सरपंच व त्याचे भाऊ या तिघांच्या मनात राग होता. शुक्रवार रोजी किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. अंधारसांगवी येथील सरपंच व त्याचे दोन भाऊ असे तिघांनी सुदर्शन मधुकर ताजणे याला मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच, वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार धनराज गजानन देवकर यांनाही सरपंच व त्याचे दोन भाऊ तिघांनी शिवीगाळ व धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली, याबाबत सुदर्शन मधुकर ताजणे, यांनी चान्नी पोलीस स्टेशनला धाव घेतली असता, पोलिसांनी त्याच्यावर चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून केले. त्याचप्रमाणे, ताजने यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंधारसांगवी ग्रामपंचायतीचे सरपंच आरोपी नथ्थू मारोती चवरे व त्याचे भाऊ बबन मारोती चवरे, दिनकर मारोती चवरे या तिघांविरुद्ध भादंवीच्या ३२४, ३२३, ५०६, ३४ कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे, तसेच पत्रकार धनराज देवकर यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे, पत्रकार धनराज देवकर यांनीही चान्नी पोलिसात तक्रार दिली आहे. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.