सर्वोपचार रुग्णालयातील धर्मशाळा कुलूपबंद

By admin | Published: May 18, 2014 07:57 PM2014-05-18T19:57:18+5:302014-05-18T20:04:31+5:30

अकोला सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असलेली धर्मशाळा मागील वर्षभरापासून कुलूपबंद!

Sarvaopachal Hospital Dharmashala lockup | सर्वोपचार रुग्णालयातील धर्मशाळा कुलूपबंद

सर्वोपचार रुग्णालयातील धर्मशाळा कुलूपबंद

Next

अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी असलेल्या धर्मशाळेला मागील वर्षभरापासून कुलूपबंद ठेवण्यात आले आहे. धर्मशाळा कुलूपबंद असल्याने शासनाचा लाखो रुपये खर्च पाण्यात जात असून, रुग्णांच्या नातेवाईकांना कडाक्याच्या उन्हातही उघड्यावर झोपावे लागत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये दिवसाला शेकडो रुग्ण दाखल होत असून, त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी निवासासाठी धर्मशाळा बांधण्यात आलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील पाण्याच्या टाकीजवळ सुमारे ४० लाख रुपये खर्चून धर्मशाळा बांधण्यात आलेली असून अद्यापही ती रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खुली करण्यात आली नाही. चकाचक असलेल्या या धर्मशाळेचे बांधकाम तब्बल एक वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र अद्यापही या धर्मशाळेत रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश देण्यात आलेला नाही. कडाक्याचे ऊन असतानाही रुग्णांच्या नातेवाईकांना वॉर्डाच्या आजूबाजूला उघड्यावर आधार शोधून झोपावे लागत आहे. सामान्य रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेल्या या धर्मशाळेत रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून या मागणीकडे डोळेझाक करण्यात येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात रोज सुमारे ७०० ते ८०० रुग्ण उपचारासाठी येत असून, त्यांच्यासोबत सुमारे एक हजार ते १२०० नातेवाईक येतात. एकूणच या ठिकाणी दिवसाला सुमारे १७०० ते १८०० जणांची ये-जा असून, यापैकी ५०० ते ६०० रुग्णांना दाखल करण्यात येते व त्यांच्यासोबत सुमारे ७०० नातेवाईक रुग्णालयात मुक्कामी असतात. रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आराम करण्यासाठी बांधण्यात आलेल्या धर्मशाळेचा रुग्णांच्या नातेवाईकांना कुठलाही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. धर्मशाळेत प्रवेश मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना उघड्यावरच झोपावे लागत असल्याने धर्मशाळा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तातडीने खुली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

*टीबी रुग्णही बाहेर
सर्वोपचार रुग्णालयातील टीबी रुग्णही वॉर्डाच्या बाहेर फिरत असल्याने इतरांना टीबी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे टीबी रुग्णांना वॉर्डातच थांबण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी रुग्णालय परिसरात राहणार्‍या रहिवाशांनी केली आहे. टीबी रुग्ण वॉर्डातच थांबल्यास इतरांना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण होणार नाही.

Web Title: Sarvaopachal Hospital Dharmashala lockup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.