‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत कारंजाला १८ लाखांचे बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:54 AM2017-08-07T02:54:00+5:302017-08-07T03:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाचे उत्कृष्ट कार्य केल्याप्रकरणी कारंजा तालुक्याला पहिल्या क्रमांकाचे १८ लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले. द्वितीय धनज बु.
७.५ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाचे ५ लाख रुपयाचे बक्षीस जानोरा ग्रामपंचायतीला मिळाले. पुणे येथील शिवछत्रपती स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये रविवार, ६ आॅगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातून कारंजा तालुक्याचा समावेश झाला होता. स्पर्धेच्या काळात जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ या कालावधीत स्पर्धा घेण्यात आली. त्यात तालुका स्तरावर उत्तम कामगिरी केल्यामुळे कारंजाला प्रथम क्रमांकाचे १८ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले, तर ग्रामीण भागात धनज बु. आणि जानोरा ग्रामपंचायतींनी स्पर्धेत बाजी मारली. दरम्यान, रविवारी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास सत्यजित भटकळ, नीता अंबानी, राजीव बजाज यांच्यासह चित्रपट अभिनेता शाहरूख खानची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी जयपूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय काळे व ताराबाई यांनाही गौरविण्यात आले.