पोषण आहार पुरवठा निविदेत बचत गट अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:43 PM2020-02-24T13:43:16+5:302020-02-24T13:43:22+5:30
जिल्ह्यातील काही तालुक्यांत बचत गटांना निविदाच सादर करता आल्या नसल्याची माहिती आहे.
अकोला : गरोदर, स्तनदा माता, सहा वर्षे वयोगटातील बालकांना गरम, ताजा आहार पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रियेतून बचत गटांची निवड प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेतील अटी व शर्तींमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांत बचत गटांना निविदाच सादर करता आल्या नसल्याची माहिती आहे. त्याबाबत अमरावती जिल्ह्यात केलेला बदल अकोला जिल्ह्यातही लागू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्च २०१९ रोजी राज्यातील ठरावीक १८ संस्थांची कामे रद्द करून बचत गटांना देण्याचा आदेश दिला. त्यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने महिला बचत गटांना ही कामे देता महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅप. कन्झ्युमर्स फेडरेशनला कच्चे धान्य पुरवठ्याचा आदेश दिला. त्यानंतर महिला बचत गटांकडून कच्च्या धान्याचा पुरवठा करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने आॅगस्ट २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली. निविदा प्रक्रियेत सहभागी बचत गटांची प्रमाणपत्रे, उत्पादन केंद्र, किचन पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरीय उपसमितीमध्ये अध्यक्ष म्हणून तहसीलदार आहेत. त्या समित्यांनी जिल्ह्यातील ५८ बचत गटांचा पडताळणी अहवाल २० नोव्हेंबरपर्यंतच मागविण्यात आला होता. ६ फेब्रुवारीपर्यंत बार्शीटाकळी तालुका वगळता इतरांकडून तो प्राप्त झाला नव्हता. त्यावेळी पुढील दोन दिवसांत अहवाल प्राप्त होतील, असे महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी सांगितले. त्यानंतर अद्यापही निविदा प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. त्यामुळे अकोल्यासह इतरही जिल्ह्यांमध्ये आहार पुरवठ्याचे काम महाराष्ट्र कन्झ्युमर्स को-आॅप. फेडरेशनकडूनच सुरू ठेवण्याचे प्रयत्न त्यातून केले जात आहेत.
विशेष म्हणजे, निविदा प्रक्रियेत पात्रतेच्या अटी व शर्तीमुळे अनेक महिला बचत गटांना त्यामध्ये सहभागीच होता आले नाही. परिणामी, काही तालुक्यांतील निविदा प्रक्रिया निरंक दर्शविली जात आहे. त्या तालुक्यामध्ये बचत गटांची निवड होणार नाही. ते काम कोणाला द्यावे, याची तयारी आता महिला व बालकल्याण विभागाला करावी लागणार आहे.