‘बंद’मुळे शाळांमध्ये सावित्रीबाई फुले जयंती गुरुवारी साजरी होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:14 AM2018-01-04T01:14:18+5:302018-01-04T01:14:38+5:30
३ जानेवारी रोजी अकोला जिल्हय़ात बंद पाळण्यात आल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव साजरा झाला नाही. ४ जानेवारी रोजी शाळा, महाविद्यालयांमध्ये जयंती उत्सव साजरा करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिक्षण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी जयंती दिनापासून शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्याचा आदेश दिला आहे. परंतु, ३ जानेवारी रोजी अकोला जिल्हय़ात बंद पाळण्यात आल्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव साजरा झाला नाही. ४ जानेवारी रोजी शाळा, महाविद्यालयांमध्ये जयंती उत्सव साजरा करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
विद्या प्राधिकरणाने शिक्षणाधिकार्यांना पत्र पाठवून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या (३ जानेवारी) जयंती दिनापासून ते २६ जानेवारीपर्यंत शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यास सांगितले आहे. तसेच अभियानादरम्यान विविध उपक्रम राबविण्यासाठी कार्यक्रमांचे नियोजनसुद्धा दिले आहे. परंतु, कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने, ३ जानेवारी रोजी अचानक शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये ४ जानेवारीपासून शाळांमध्ये प्रभात फेरी, पथनाट्य, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचा जीवन चरित्र परिचय द्यावा आणि बालिका दिनाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यावी. तसेच एकांकिका सादरीकरण, लघुपट दाखवावा, एक किंवा दोन कन्या अपत्यांवर थांबलेल्या माता, पित्यांचा सन्मान करावा. माता मेळावा घ्यावा. विविध क्षेत्रात कार्यरत कर्तबगार महिलांचा सन्मान करावा. तसेच स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी प्रतिज्ञा द्यावी. यासह विविध उपक्रमांचे शाळेत आयोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
बंद आंदोलनामुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी द्यावी लागली. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी ४ जानेवारीपासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा करावा आणि शाळेमध्ये विविध उपक्रम राबवावेत आणि त्याचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयात पाठवावा.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी