‘से नो टू प्लास्टिक’ : जनजागृतीसाठी धावले अकोलेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 01:36 PM2019-02-04T13:36:42+5:302019-02-04T13:36:58+5:30
अकोला: प्लास्टिकचा वापर टाळण्याकरिता या थिमवर आधारित यंदाची वॉकेथॉन स्पर्धा रविवारी पार पडली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
अकोला: प्लास्टिकचा वापर टाळण्याकरिता या थिमवर आधारित यंदाची वॉकेथॉन स्पर्धा रविवारी पार पडली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
आयएमए वॉकेथॉन ही सार्वजनिक जनजागृती रॅली आहे. समाजाला चालण्याच्या सवयीचे फायदे लक्षात आणून देणे, ही डॉक्टरांची नैतिक जबाबदारी असल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा स्पर्धेचे अकरावे वर्ष होते. स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. १०, ६ आणि ३ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत ६ ते ६५ वर्षांवरील स्त्री-पुरुष नागरिकांनी सहभाग घेतला. ‘वा रे अकोला’ आणि ‘बिनधास्त बंदे’ या दोन वेशभूषा स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये स्पर्धकांनी प्लास्टिक बंदी या विषयावर वेशभूषा व स्लोगन तयार केले. चिमुकल्यांनी सैनिक, मिस वर्ल्डच्या वेशभूषा साकारू न प्लास्टिक वापर टाळावा, असा संदेश दिला. वॉकेथॉन स्पर्धेला आयएमए हॉल येथून सुरुवात झाली. स्पर्धेचा समारोप वसंत देसाई क्रीडांगण येथे करण्यात आला.
स्पर्धेचा समारोप
स्पर्धेचा समारोप खासदार अॅड़ संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सृदृढ आरोग्याचा संदेश देणारी वॉकेथॉन ही एक चळवळ असून, ही मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील ग्रामीण भागात गावा-गावांत पोहोचावी, अशी अपेक्षा यावेळी खासदार धोत्रे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर, चित्रपट निर्माते डॉ. दीपक मोरे, अभिनेता अमित्रियान पाटील यांची उपस्थिती होती. समारोप कार्यक्रमात वॉकेथॉनमध्ये सहभागी तीन वयस्कर धावकांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पृथ्वीराज विज, रत्नकुमार वालचाळे, अशोक देशमुख यांचा सहभाग होता. उत्कृष्ट वेशभूषाबद्दल वीरश्री राठोड, केतकी दंदे यांना सन्मानित करण्यात आले. वॉकेथॉन सहभागी जसनागरा ग्रुप, गार्गी भगत, ब्ल्यू मॅनमॉर क्लब, आसूड ग्रुप, पिंकथॉन ग्रुपला ‘वा रे अकोला’ उपक्रमांतर्गत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.