तू आवडत नाही म्हणत, पतीने पाठवली घटस्फोटाची नोटीस!
By नितिन गव्हाळे | Published: September 23, 2023 08:38 PM2023-09-23T20:38:51+5:302023-09-23T20:39:42+5:30
खदान पोलिस ठाण्यात पतीसह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल
नितीन गव्हाळे, अकोला: तु मला आवडत नाही, तुझ्यासोबत संसार करायचा नाही. असे म्हणत, पतीने घटस्फोटाची नोटीस पाठविली. यासोबतच सासू व सासऱ्याने अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत, शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणात खदान पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला.
खडकी येथे राहणाऱ्या भाग्यश्री कैलास वाघमारे(३३) यांच्या तक्रारीनुसार मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा येथील कैलास भिमराव वाघमारे(३६) याच्यासोबत २०१४ मध्ये लग्न झाले झाले. लग्नामध्ये वडिलांनी ७५ ग्रॅमचे दागिने दिले होते. काही दिवस सासरी राहिल्यानंतर सासू मंदा वाघमारे हिने अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. पतीची नोकरी मुंबईला असल्याने, तेथे राहायला गेलो. डोंबवली येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून २ लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. पैसे आणण्यास नकार दिल्याने, पती कैलास वाघमारे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तु मला आवडत नाही, तुझ्यासोबत संसार करायचा असे म्हणायचे.
पुढे त्यांनी घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि घरातून मुलासह हाकलून दिले. या प्रकरणात विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार दिली. भरोसा सेलमध्ये पती-पत्नीमध्ये समेट झाला नाही. अखेर खदान पोलिसांनी पती कैलास वाघमारे, सासू मंदा, सासरे भिमराव वाघमारे व जेठ श्रीकृष्ण वाघमारे यांच्याविरूद्ध भादंवि कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे करीत आहेत.