तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 01:50 PM2019-02-18T13:50:30+5:302019-02-18T13:50:45+5:30
अकोला: सीटीएस (चेक ट्रान्जेक्शन सिस्टीम) अंतर्गत तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प पडली असून, गेल्या पाच दिवसांपासून धनादेश वटविल्या न गेल्याने कोट्यवधीची आर्थिक उलाढाल थांबली आहे.
- संजय खांडेकर
अकोला: सीटीएस (चेक ट्रान्जेक्शन सिस्टीम) अंतर्गत तांत्रिक बदलामुळे एसबीआयची क्लिअरिंग सेवा ठप्प पडली असून, गेल्या पाच दिवसांपासून धनादेश वटविल्या न गेल्याने कोट्यवधीची आर्थिक उलाढाल थांबली आहे. तांत्रिक बदल बँकेचा असला तरी धनादेश न वटविल्या गेल्याच्या कारवाईचा भुर्दंड मात्र तांत्रिकदृष्ट्या ग्राहकांनाच सोसावा लागणार आहे.
रिझर्व बँकेच्या निर्देशान्वये १५ सप्टेंबर १८ पासून धनादेश वटविण्यासाठी सीएसटी पद्धत लागू झाली. प्रत्येक बँकेत येणारे धनादेश स्कॅन केले जातात. सत्यतेची शहानिशा झाल्यानंतर तो धनादेश अल्ट्रा व्हायलेट मशीनमध्ये तपासून स्कॅन झालेली ई-मेज इंटरनेटद्वारे वटविण्याची पाठविली जाते. धनादेश आणि सोबतची बँक स्लीप दोन्ही ई-मेजची सत्यता पडताळणी झाल्यानंतरच तो धनादेश वटविला जातो. या पद्धतीने कामकाज सप्टेंबरपासून सुरू झाले. दरम्यान, फेब्रुवारीत आरबीआयने यंत्रणेत अंतर्गत तांत्रिक बदल केले. हा बदल स्वीकारण्यासोबतच भारतीय स्टेट बँकेत असलेला लोड क्षमतेबाहेर गेल्याने, स्टेट बँकेचे शेकडो धनादेश पाच दिवस वटविल्या गेले नाही. धनादेश वटविल्या न गेल्याने ग्राहकांनी बँकेत धाव घेतली. तांत्रिक कारणांमुळे धनादेश वटविल्या जाणार नाही, अशी स्पष्ट नोटीस बँकांमध्ये लावल्या गेली. कोट्यवधीची आर्थिक उलाढाल थांबल्याने ग्राहक त्रासले. सोबतच धनादेश अनादर झाल्याच्या कारवाईचा फटकादेखील आता ग्राहकांना सोसावा लागत असल्याने ग्राहक संतापले आहेत. ही समस्या केवळ अकोल्यापुरता मर्यादित नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
- रिझर्व बँक आॅफ इंडियाने सीटीएस (चेक ट्रान्जेक्शन सिस्टीम) सेवा अलीकडेच एनसीआर कंपनीला दिली. स्वॉफ्टवेअर बदलल्या गेल्याने आणि सोबतच सर्व्हर डाउनची समस्या असल्याने काही दिवस ही समस्या कायम होती; मात्र आता धनादेश वटविले जात आहेत. दररोज अकोल्यात ८०० धनादेश वटविण्यासाठी येतात. सीटीएससाठी बँकेत ४ कर्मचारी कार्यरत असून, ते देखील अपुरे आहे.
- राजेंद्र ढोक, महाव्यवस्थापक, एसबीआय, अकोला.