हिवरखेड ग्रामपंचायतीमध्ये घोटाळा; माजी सरपंचांसह ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:27 AM2021-02-23T04:27:52+5:302021-02-23T04:27:52+5:30
तेल्हारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे आणि ...
तेल्हारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांनी शासनाच्या १४व्या वित्त आयोगाच्या सन २०१६-१७ आणि सन २०१७-१८च्या मंजूर आराखड्यातील कामे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात केली. सन २०१६, १७, १८च्या कामाकरिता एकूण रक्कम एक कोटी ३७ लाख २० हजार ७४३ रुपये बँक खात्यातून काढले; मात्र ग्रामपंचायत मोजमाप पुस्तकामध्ये ८२,६२,९१४चे मूल्यांकन प्राप्त झाले असून, यामध्ये ५०,४३,५११ रुपयांची तफावत आढळली आहे. या रकमेचे प्रत्यक्ष काम झालेले नसून, शासकीय निधीचा तत्कालीन सरपंच शिल्पा मिलिंद भोपळे व ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांनी संगनमत करून निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. अशा लेखी फिर्यादीनुसार, हिवरखेड पोलिसांनी आरोपी शिल्पा मिलिंद भोपळे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४०९, ४२०, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास ठाणेदार धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वात हिवरखेड पोलीस करीत आहेत.
एलईडी लाइट प्रकरणातही गुन्हा दाखल
हिवरखेड ग्रामपंचायत क्षेत्रात एलईडी दिवे खरेदी करताना खात्री न करता खोट्या दस्तावेजाच्या आधारे मे. गजानन इलेक्ट्रिकल्स, पुणे यांना देयक अदा केले. त्यामुळे ४,७४,७७९ रुपयांचे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता झाली. त्यामुळे तत्कालीन सरपंच अरुणा सुरेश ओंकारे आणि ग्रामविकास अधिकारी गरकल यांनी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार करून ही रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरली, अशी फिर्याद विस्तार अधिकारी सतीश सरोदे यांनी दिल्याने हिवरखेड पोलिसांनी तत्कालीन सरपंच अरुणा सुरेश ओंकारे आणि ग्रामविकास अधिकारी भीमराव गरकल यांच्यावर भादंवि ४०९, ४२०, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.