ऐन रब्बीच्या तोंडावर खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांची वाढणार डोकेदुखी, अकोला जिल्ह्यासाठी ७१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी
By रवी दामोदर | Published: September 27, 2022 02:04 PM2022-09-27T14:04:55+5:302022-09-27T14:05:34+5:30
Akola News: खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे.
- रवी दामोदर
अकोला : खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे. रब्बी हंगामाकरिता जिल्ह्याची तब्बल ७१ हजार मेट्रिक टनाची मागणी असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ १२ हजार मेट्रिक टनच खत उपलब्ध आहे. त्यामळे आगामी दिवसांत शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रांमध्ये डीएपी मिळत नसल्याची ओरडही शेतकऱ्यांमधून होत आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना डीएपीसाठी नाहक त्रास सहन करावा लागला. आता ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डीएपी तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात केवळ १२५१ मेट्रिक टन डीएपी उपलब्ध असल्याचे ऑनलाइन दिसून येत असले तरी प्रत्यक्षात मात्र कृषी सेवा केंद्र चालक डीएपीचा तुटवडा असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८६ हजार ३१० मेट्रिक टन मागणी कृषी विभागाने केली होती. त्यापैकी ८५ हजार ९०५ मेट्रिक टन प्राप्त झाला आहे. रब्बी हंगाम २०२२-२३ करिता कृषी विभागाकडून ७१ हजार मेट्रिक टन मागणी असून, जिल्ह्यात केवळ १० हजार ते १२ हजार मेट्रिक टनच खतं उपलब्ध आहे. त्यापैकी डीएपी खत शेतकऱ्यांना मिळत नसल्याने ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
हरभऱ्याचे क्षेत्र वाढणार !
जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र वाढणार आहे. बहुतांश भाग खारपाणपट्टा असल्याने शेतकरी दरवर्षी हरभऱ्याला पसंती देतात. पश्चिम विदर्भातील अकोल्यासह, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र मोठे आहे. हरभरा उत्पादक शेतकरी पेरणीच्या वेळी डीएपीचा वापर करतात. मात्र, खत टंचाई असल्याने शेतकऱ्यांची ऐनवेळी धावाधाव होणार आहे.