पाणीपुरवठा योजनांवर टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:31 AM2017-09-21T01:31:27+5:302017-09-21T01:31:39+5:30
अकोला : जिल्हय़ातील ६९२ पाणीपुरवठा योजनांनी महावितरणचे तब्बल सात कोटी रुपये थकविले असून, ही रक्कम वसूल होत नसल्याचे पाहून महावितरणने आता या योजनांना वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. ठरावीक मुदतीत थकबाकीची रक्कम भरली नाही, तर वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराच महावितरणने नोटीसद्वारे दिल्यामुळे या पाणीपुरवठा योजना वांध्यात आल्या आहेत.
अतुल जयस्वाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील ६९२ पाणीपुरवठा योजनांनी महावितरणचे तब्बल सात कोटी रुपये थकविले असून, ही रक्कम वसूल होत नसल्याचे पाहून महावितरणने आता या योजनांना वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. ठरावीक मुदतीत थकबाकीची रक्कम भरली नाही, तर वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराच महावितरणने नोटीसद्वारे दिल्यामुळे या पाणीपुरवठा योजना वांध्यात आल्या आहेत.
महावितरणचा घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांकडील थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजनांकडील थकबाकीही मोठी आहे. वीज देयकांची वसुली करताना मात्र महावितरणच्या नाकीनऊ येत आहेत. आता मात्र महावितरण थकबाकी वसुलीसाठी सरसावली असून, वीज देयक न भरणार्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे धोरण अवलंबिले आहे. जिल्हय़ातील एकूण पाणीपुरवठा योजनांपैकी ६९२ पाणीपुरवठा योजनांकडे महावितरणची ७ कोटी ३ लाख २५ हजार ७९८ रुपयांची थकबाकी असून, ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीतील असलेल्या पाणीपुरवठा योजनांनी वीज वापरापोटीची रक्कम मोठय़ा प्रमाणात थकविली आहे. शासनाच्या अंगीकृत असल्यामुळे महावितरणने या योजनांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी मुदत वाढवून दिली, तसेच ही रक्कम टप्प्या-टप्प्याने भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली; परंतु पाणीपुरवठा योजनांकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर महावितरणने या योजनांना नोटीस जारी करून वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.
नोटीस बजावल्या
पाणीपुरवठा योजनांकडील थकबाकी वसूल व्हावी, यासाठी महावितरणने त्यांना ही रक्कम टप्प्या-टप्प्याने भरण्याची मुभा दिली होती. यानुसार एकूण रकमेच्या २0 टक्क्यांचा एक, असे पाच हप्ते पाडून थकबाकी भरण्याची सुविधा महावितरणने दिली; परंतु योजनांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महावितरणने या योजनांना नोटीस बजावल्या आहेत.
पाणीपुरवठा योजनांनी थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, यासाठी त्यांना विनंती केली; परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. थकबाकी न भरणार्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा नियमाप्रमाणे खंडित करण्यात येईल.
- दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता, अकोला मंडळ, महावितरण.
-