शिष्यवृत्ती परीक्षा निकाल घसरला!
By admin | Published: June 29, 2017 12:56 AM2017-06-29T00:56:02+5:302017-06-29T00:56:02+5:30
गुणवत्ता यादीत केवळ चार विद्यार्थी: १५ हजारांपैकी दोन हजार विद्यार्थी उत्तीर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी व आठवी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अकोला जिल्ह्याची निकालातील टक्केवारी घसरली आहे. राज्यातील गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून केवळ चार विद्यार्थी झळकले आहेत.
अकोला जिल्ह्यातून पूर्व उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला इयत्ता पाचवीचे ७ हजार ८८० विद्यार्थी, तर आठवीचे ७ हजार ४२६ विद्यार्थी बसले होते. शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीचे ११७४ विद्यार्थी, तर आठवीचे ९७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण भागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हाता येथील विद्यार्थिनी गायत्री रामदास वनारे हिने ९३.३३ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावले. भक्ती सुनील दिवनाले हिने ८९.३३ टक्के, आशा गौतम दामोदर हिने ८८.६६ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले, तसेच रोहित शंकर ईश्वरकर याने ८७.९१ टक्के, क्षितिजा पंकज देशमुख हिने ८७.३३, मधुरा प्रदीप किडिले हिने ८५.३३, अभिनव सदानंद जायले याने ८५.२३, सुहानी अजयकुमार गुप्ता हिने ८५.२३ टक्के गुण प्राप्त केले. शहरी भागातून एकाही विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीत स्थान मिळविता आले नाही. आठवीतील विद्यार्थी भ्रुगीश मेहूल वोरा, हर्ष सुनील देशमुख यांनी ९०.४७ टक्के मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. ईशा राजाभाऊ पाथ्रीकर हिने ८८.४३ टक्के गुण प्राप्त केले. रसिका दिनेश मल हिने ८७.७५ टक्के, पूर्वा परीक्षित सारडा हिने ८५.०३ टक्के गुण मिळविले.
प्रतीक्षा सुनील मिश्रा हिने ८४.३५ टक्के गुण मिळविले. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्याची शिष्यवृत्ती परीक्षेत घसरलेली निकालाची टक्केवारी चिंताजनक आहे. राज्यातील गुणवत्ता यादीत केवळ चार विद्यार्थ्यांना स्थान मिळाल्याने जिल्ह्याचा निकाल किती माघारला आहे, हे दिसून येते.