पुनर्वसित आदिवासी गावात वाजणार शाळेची घंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:17+5:302020-12-11T04:45:17+5:30

तेल्हारा : सातपुडा पर्वत रांगातील वान व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित व तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित आदिवासी गावांमध्ये लवकरच शाळेची घंटा ...

School bell to ring in rehabilitated tribal village! | पुनर्वसित आदिवासी गावात वाजणार शाळेची घंटा !

पुनर्वसित आदिवासी गावात वाजणार शाळेची घंटा !

Next

तेल्हारा : सातपुडा पर्वत रांगातील वान व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित व तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित आदिवासी गावांमध्ये लवकरच शाळेची घंटा वाजणार आहे. यामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या नईतलई व उंबर शेवडी येथील आदिवासी कुटुंबातील बालकांना गावातच शिक्षण उपलब्ध होणार आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी नव्याने वसलेल्या नईतलई व उंबर शेवडी येथे इयत्ता १ ते ८ वर्गाच्या नवीन शाळेला प्रारंभ करण्यास शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली ठग यांनी परवानगी दिली आहे. शिक्षण विभाग पंचायत समिती तेल्हारा यांनी या गावात संच मान्यता प्राप्त होईपर्यंत पर्यायी शैक्षणिक सुविधा देण्यासाठी कार्यवाही करण्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सातपुडा पर्वतरांगातील वान अभयारण्यातील स्थलांतरित होऊन पुनर्वसित झालेल्या तेल्हारा तालुक्यातील नईतलई व उंबर शेवडीमधील विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. जिल्हा परिषद सदस्या प्रमोदिनी कोल्हे व दीपमाला दामधर यांच्या मागणीनुसार गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतंडे यांनी पुढाकार घेत सर्वेक्षण करून जिल्हा प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. शाळा नसलेल्या या गावात शैक्षणिक सुविधा सुरू करण्यासाठी नवीन शाळा सुरू करण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.

खंडाळा केंद्र शाळेअंतर्गत येणाऱ्या नईतलई येथे कोरकू व उंबरशेवडी येथे राठिया समुदाय वास्तव्यास आहेत. टाळे बंदीच्या काळात केंद्रप्रमुख गजानन गायगोळ यांच्या मार्गदर्शनात जागर फाउंडेशनने बालरक्षक तुलसीदास खिरोडकार लिखित कोरकू बोलीभाषिक बालस्नेही पुस्तकाचे घरोघरी वाटप करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली होती. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या गावांमध्ये शाळेची घंटा वाजणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्वेक्षणानुसार पात्र विद्यार्थी

मोहपाणी-१०

उंबर शेवडी-३९

नईतलई-७९

तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थी शालेय प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

दिनेश दुतंडे, गटशिक्षणाधिकारी

आदिवासी बोलीभाषिक मुलांना प्रमाणभाषेत दर्जेदार शिक्षण मिळवून देऊ.

गजानन गायगोळ, केंद्रप्रमुख खंडाळा

Web Title: School bell to ring in rehabilitated tribal village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.