विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार!
By admin | Published: September 1, 2016 02:44 AM2016-09-01T02:44:16+5:302016-09-01T02:44:16+5:30
खेट्रीच्या जि.प. शाळेतील प्रकार; समायोजन न केल्याने पालक संतप्त.
खेट्री(जि. अकोला),दि. ३१ : येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत सहा शिक्षकांपैकी एका शिक्षकाचे समायोजन करण्यात आल्याने संतप्त झालेल्या पालकांनी २९ व ३0 ऑगस्ट रोजी शाळेवर बहिष्कार टाकून मुलांना शाळेत पाठविले नाही. संबंधितांकडे सदर शिक्षकाचे समायोजन रद्द करा, असे निवेदन सादर करूनही समायोजन रद्द न केल्याने पालकांनी मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले शाळेतून काढण्याचा निर्णय घेऊन शाळेत धाव घेतल्याचा खळबळजनक प्रकार ३१ ऑगस्ट रोजी घडला.
खेट्रीच्या जि.प.शाळेत सहा शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस कमी होत चाललेली पटसंख्या पाहता शिक्षण विभागाने तालुक्यातील शिक्षकांचे समायोजन करण्याची प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत खेट्रीच्या जि.प.शाळेतील गजानन विश्वनाथआप्पा हिंगमिरे या शिक्षकाचे समायोजन करण्यात आले. त्यानुसार मुख्याध्यापिकेने सदर शिक्षकाला कार्यमुक्त केले. या घटनेची माहिती गावकर्यांना होताच गावात खळबळ उडाली. परिणामी, या शाळेत मुले शिकत असलेल्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यावर बहिष्कार टाकला. त्यानंतर संबंधितांकडे सदर समायोजन रद्द करा, असे निवेदन सादर केले; परंतु संबंधितांना समायोजन रद्द न केल्यामुळे गावातील अनिल ताले, दगडू ताले, सुधाकर तिडके, शंकर आढोळे, भानुदास सगळगिळे, राजू मोरे आदी संतप्त पालकांनी ३१ ऑगस्ट रोजी शाळेत धाव घेऊन शाळेतील मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले काढण्याचे ठरविले; परंतु मुख्याध्यापिका केंद्राची मिटिंग असल्यामुळे शाळेत उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या पालकांना त्यांच्या पाल्यांचे शाळा सोडल्याचे दाखले मिळू शकले नाहीत. या शाळेतील पहिल्या ते सातव्या ७ वर्गापर्यंत जवळपास १00 विद्यार्थी शिकत आहेत. शाळेतील सात वर्गांतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी फक्त पाचच शिक्षक असल्यामुळे पालक संताप व्यक्त करीत आहेत. सदर शिक्षकाचे समायोजन रद्द न केल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी निवेदनात वरिष्ठ अधिकार्यांना दिला आहे.