तर स्कूल बसेसचे परवाने निलंबित

By admin | Published: May 22, 2017 01:13 AM2017-05-22T01:13:23+5:302017-05-22T01:13:23+5:30

विशेष तपासणी मोहीम; उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आदेश

School buses licenses are suspended | तर स्कूल बसेसचे परवाने निलंबित

तर स्कूल बसेसचे परवाने निलंबित

Next

सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची २० ते ३१ मे या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या तपासणीत विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास धोकादायक असलेल्या स्कूल बसेसचे परवाने कायस्वरूपी निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या याचिकेवर न्यायालयाने उन्हाळी सुटीत या स्कूल बसेसची तपासणी करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जून महिना ते मे महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसमधून सुरक्षित वाहतूक होत आहे की नाही, याची तपासणी करण्यात येते की नाही, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने राज्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना आदेश देऊन उन्हाळी सुटीत शहर आणि जिल्ह्यातील नोंदणीकृत सर्व स्कूल बसेसची तपासणी करण्याचे स्पष्ट केले आहे.
त्यानुसार अकोला जिल्ह्यातील स्कूल बसेसची विशेष तपासणी मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सुरू केली आहे. २० ते ३१ मे या कालावधीत स्कूल बसेस खडकी येथील कार्यालयात आणून त्याची तपासणी करून घेण्याची जबाबदारी ही संबंधित स्कूल बस चालक आणि मालक यांच्यावर निश्चित केली आहे. ज्या स्कूल बसेस तपासणीसाठी येणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून, त्यांचे परवाने निलंबित करण्यात येणार आहे.
तर ज्या स्कूल बसेस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित नाहीत, त्यांचेही परवाने निलंबित करण्यात येणार आहेत. त्यामुळे जून २०१७ या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेस या तपासणी केल्यानंतरच वाहतुकीस पात्र राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

न्यायालयातील याचिकेनंतर कारवाई
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या याचिकेवर न्यायालयाने स्कूल बस तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ही तपासणी मोहीम सुरू केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या स्कूल बसेसचे मालक स्कूल बस तपासणीसाठी आणणार नाहीत, त्यांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्कूल बसेसच्या मालकांनी त्यांच्या बसेस तातडीने तपासणीसाठी आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-अतुल आदे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.

Web Title: School buses licenses are suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.