शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडतेय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:23 AM2021-08-24T04:23:19+5:302021-08-24T04:23:19+5:30
अकाेला : कोरोनाच्या संकटामुळे शाळांचे सुरू असलेले लाॅकडाऊन अजूनही सुरूच आहे, गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने ...
अकाेला : कोरोनाच्या संकटामुळे शाळांचे सुरू असलेले लाॅकडाऊन अजूनही सुरूच आहे, गत दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने केवळ ऑनलाइन शिक्षण असल्याने मुले घरातच आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, हट्टीपणा यासह पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता गतवर्षी पहिली ते चौथीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंदच राहिले. पाचवी ते बारावीच्या शाळा काही दिवसांसाठी सुरू होत्या. यंदादेखील काेराेनाची संभाव्य लाट पाहता विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
मुले घरातच असल्याने मोबाइल व टीव्हीचे व्यसन जडत आहे. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावरही होत आहे. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढीस लागला आहे. आत्मविश्वास नसणे, नैराश्य, एकलकोंडेपणा, हट्टीपणा, कशातच मन न लागणे आदी समस्या जाणवत आहेत. त्यामुळे पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.
मुलांच्या समस्या
मैदानांवरही निर्बंध हाेते; त्यामुळे मित्रांबरोबर प्रत्यक्ष जाऊन खेळणे थांबले आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी होत आहेत. मुलांमधील ऊर्जेला सद्य:स्थितीत पुरेशी वाट मिळत नाही. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. मुले जास्त हट्टी होत आहेत. मोबाइल, संगणक, टॅबच्या आहारी गेली आहेत.
पालकांच्या समस्या
शाळा बंद, परीक्षा नाही त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता पालकांना सतावत आहे. यातूनच नैराश्य, चिडचिडेपणाही वाढत असल्याचे समोर येत आहे. मुले मोबाइलच्या आहारी जात असल्याचे पाहून, पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
ऑनलाइन शिक्षणामुळे माेबाइलचा अतिवापर सुरू झाला आहे. त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहेत. मुले एकलकोंडी होत आहेत. सकारात्मक चर्चा हवी, ती होत नाही. तसेच शिक्षक व विद्यार्थी संवाद गांभीर्याने होत नाही.
- डाॅ. सुजय पाटील,
मानसोपचार तज्ज्ञ
मुलांमध्ये आळशीपणा वाढत आहे. बुद्धिमत्तेची चंचलता कमी होणे, द्विधा स्थिती निर्माण होत आहे. कमजोरी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात. मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे.
- डाॅ. माेनिका मालाेकार,
मानसोपचार तज्ज्ञ,
पहिली ते आठवीचे तालुकानिहाय विद्यार्थी
अकोला पं. स. - ९१,६७४
अकोट - ३४,४५५
बाळापूर - २५,५२४
बार्शीटाकळी - १७,०११
मूर्तिजापूर - २०,०६३
पातूर - १७,१६५
तेल्हारा - २१,८४२
मनपा क्षेत्र - ७,४७९