शालेय पोषण आहार : ८६ हजार शाळांच्या खात्यात एक रुपया डिपॉझिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 06:20 PM2018-09-15T18:20:19+5:302018-09-15T18:20:47+5:30
अकोला : मध्यान्ह भोजन योजनेंतर्गंत विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी इंधन, भाजीपाला देयकाचे अनुदान थेट शाळांच्या खात्यावर आॅनलाइन जमा केले जाणार आहे.
अकोला : मध्यान्ह भोजन योजनेंतर्गंत विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी इंधन, भाजीपाला देयकाचे अनुदान थेट शाळांच्या खात्यावर आॅनलाइन जमा केले जाणार आहे. त्या शाळांच्या खात्यांची पडताळणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील ८६२०९ शाळांच्या खात्यात एक रुपया जमा केला आहे. खात्यात एक रुपया जमा न झाल्यास माहिती पडताळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शालेय पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी इंधन आणि ताजा भाजीपाला घेण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर आहे; मात्र यासाठी अनुदान मिळण्यास शासन स्तरावरून प्रचंड विलंब होत असल्याच्या तक्रारी सातत्याने झाल्या. विविध शिक्षक संघटनांनी आंदोलनातून हे अनुदान तातडीने जमा करण्याची मागणीही केली. अनुदान वाटपाची प्रक्रिया किचकट असल्याने शासन, जिल्हा कोशागार विभाग, शिक्षणाधिकारी कार्यालय तेथून पंचायत समिती, त्यानंतर मुख्याध्यापकांना दिले जायचे. ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ असल्याने अनुदान मिळण्याला कालावधी वाढत होता. त्यामुळे मुख्याध्यापकांना वर्षभरात कित्येक महिने या खर्चाचा भुर्दंड पडायचा. त्यामुळे अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत बदल करण्यासाठी ते थेट आॅनलाइन मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी राज्यातील ८६२०९ शाळांच्या खात्याची माहिती गोळा करण्यात आली. त्या खातेक्रमांकावर अनुदानाची संपूर्ण रक्कम टाकण्यापूर्वी पडताळणी होत आहे. सर्व शाळांच्या खात्यावर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रथम एक रुपया डिपॉझिट केला आहे. येत्या आठ दिवसांत खात्यावर अनुदान जमा केले जाणार आहे. त्यानुसार ज्या मुख्याध्यापकांना एक रुपया जमा झाल्याची माहिती मिळेल, त्यांनी खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- रुपया जमा न झाल्यास माहिती अपडेट करा!
ज्या शाळांच्या खात्यावर एक रुपया जमा झाला नसेल, त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेचे नाव, युडायस कोड, बँक खाते क्रमांक, आयएफएसी क्रमांक ही माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी दयानंद कोकरे यांनी केले आहे.