अतिरिक्त शिक्षकच निवडणार शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:21 AM2017-09-16T01:21:40+5:302017-09-16T01:21:45+5:30
शासनाच्या शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतील विषयनिहाय शिक्षक निवडीचे अधिकार शिक्षण संस्थांना दिले होते; परंतु शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे शिक्षण विभागाने त्यात बदल करून समायोजन करताना, अतिरिक्त शिक्षकच पसंतीक्रमानुसार शाळा निवडतील, असा निर्णय दिला. त्यामुळे आता होणार्या समायोजनामध्ये अतिरिक्त शिक्षकच शाळा निवडतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.
नितीन गव्हाळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतील विषयनिहाय शिक्षक निवडीचे अधिकार शिक्षण संस्थांना दिले होते; परंतु शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे शिक्षण विभागाने त्यात बदल करून समायोजन करताना, अतिरिक्त शिक्षकच पसंतीक्रमानुसार शाळा निवडतील, असा निर्णय दिला. त्यामुळे आता होणार्या समायोजनामध्ये अतिरिक्त शिक्षकच शाळा निवडतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.
शिक्षण संस्थांना शिक्षक निवडीचे अधिकार देण्यात आल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली होती. शिक्षण विभागाने हा निर्णय मागे घेण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली होती. पहिल्या टप्प्यात समायोजन न झालेल्या अतिरिक्त शिक्षकाला दुसर्या टप्प्यात मात्र सेवाज्येष्ठतेने त्यांच्या पसंतीने समुपदेशन पद्धतीनुसार पुढील सहा फेर्यांपर्यंत पसंतीने शाळा निवडीचा अधिकार देण्यात आला होता. अतिरिक्त शिक्षक निवडीचा अधिकार दिल्यामुळे काही शिक्षण संस्था निवडलेल्या शिक्षकाकडून आर्थिक अपेक्षा करतील, असा आरोप शिक्षकांनी केला होता. त्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला.
अतिरिक्त शिक्षकांचं ऑनलाइन समायोजन होणार असल्याने, माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, विषयनिहाय रिक्त पदे आणि आरक्षणाची माहिती मागविली असून, ही माहिती शाळांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे जमा केली आहे. शिक्षण विभागाने २0१६ व १७ च्या संचमान्यतेनुसार खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन करण्यात येणार आहे. गतवर्षी जिल्हय़ामध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते.
यंदासुद्धा अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागवून समायोजन करण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांना दिला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळांकडून अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली आहे. प्राप्त माहितीनुसार यंदा १३६ च्या जवळपास शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
जिल्हय़ातील शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया राबविण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी स्पष्ट केले. यंदा तुकडी व्यवस्था बंद करण्यात आली असून, शिक्षक अतिरिक्त ठरविताना कनिष्ठ शिक्षक, विषयाची गरज आणि आरक्षणसुद्धा समायोजनमध्ये लक्षात घेतले जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी मुकुंद यांनी स्पष्ट केले.
५२ शाळांमधील १३६ शिक्षक ठरणार अतिरिक्त!
जिल्हय़ातील ५२ शाळांमधील १३६ शिक्षक अतिरिक्त ठरणार असून, त्यात मराठी शाळा आणि अल्पसंख्याक शाळांचा समावेश आहे. अल्पसंख्याक शाळा वगळता ४८ मराठी शाळांमध्ये ७६ जागा रिक्त असून, या जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल.
शिक्षक समायोजनाबाबत पुणे येथे बैठक होणार आहे. त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार वेळापत्रकाचे नियोजन होईल. आमच्याकडे शाळांनी पाठविलेल्या माहितीनुसार ५२ शाळांमधील १३६ शिक्षक अतिरिक्त ठरतील.
- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी