ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेही राहणार बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 12:00 PM2020-03-17T12:00:20+5:302020-03-17T12:00:48+5:30
शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरुवातीला शहरातील शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यातून ग्रामीण भाग वगळण्यात आला होता; परंतु शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १६ मार्च रोजी ग्रामीण भागातील सर्व सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, खबरदारी म्हणून आणि कोरोनाचा आजार रोखण्याच्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाने शनिवारी राज्यातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला होता; परंतु यातून ग्रामीण भाग वगळण्यात आला होता. त्यामुळे शिक्षक, शिक्षक संघटना, शिक्षण संस्थाचालकांनी नाराजी व्यक्त केली होती आणि कोरोनाचा धोका ग्रामीण भागाला नाही का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. शहरांमधील शाळांमध्येच विद्यार्थ्यांची गर्दी होत नाही तर ग्रामीण भागातील शाळांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असल्याने, ग्रामीण भागातसुद्धा शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले. १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीसुद्धा आदेश काढत, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यास बजावले आहे. या निर्देशाची अवहेलना केल्यास, भादंवि कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारादेखील दिला आहे.
शिक्षकांना ड्युटी, शिक्षक संघटनांची नाराजी
कोरोनाबाबत खबरदारी घेण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे; परंतु शिक्षकांना सुट्टी न दिल्यामुळे, त्यांना शाळेत जाऊन ड्युटी करावी लागत आहे. याबाबत शिक्षकांसह शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी, शिक्षकांनी शाळेत जाऊन त्यांची इतर शैक्षणिक कामे करण्यास म्हटले आहे; परंतु या निर्णयाबाबत शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करीत, शिक्षक माणसे नाहीत का, त्यांना कोरोना विषाणूपासून बाधा होणार नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविण्याचे प्रमुख काम आहे; परंतु विद्यार्थीच शाळेत नाहीत तर शिक्षकांनी शाळेत जाऊन काय करायचे? त्यामुळे शिक्षकांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्ठी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.